सुस्थितीतील आरोग्य उपकेंद्र दाखविले गळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:51 AM2018-12-08T00:51:06+5:302018-12-08T00:51:22+5:30

मालेगाव तालुक्यातील दाभाडी आरोग्य उपकेंद्राला गळती लागल्याचे कारण पुढे करीत नूतनीकरणासाठी जिल्हा परिषदेला अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात या आरोग्य केंद्राची पाहणी केली असता इमारत कुठेही गळत नसल्याची बाब समोर आली आणि बोगस अंदाजपत्रकाचा कारनामाही समोर आला.

Suitable health sub-centers show lacerations | सुस्थितीतील आरोग्य उपकेंद्र दाखविले गळके

सुस्थितीतील आरोग्य उपकेंद्र दाखविले गळके

Next
ठळक मुद्देभांडाफोड : प्रत्यक्ष पाहणीत आढळले; कारनामा उघड

नाशिक : मालेगाव तालुक्यातील दाभाडी आरोग्य उपकेंद्राला गळती लागल्याचे कारण पुढे करीत नूतनीकरणासाठी जिल्हा परिषदेला अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात या आरोग्य केंद्राची पाहणी केली असता इमारत कुठेही गळत नसल्याची बाब समोर आली आणि बोगस अंदाजपत्रकाचा कारनामाही समोर आला.
मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील आरोग्य उपकेंद्राच्या (क्र .२) नूतनीकरणाच्या कामाचे अंदाजपत्रक मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. बुधवारी मालेगाव येथील रूरबन योजनेची बैठक आटोपल्यानंतर मुख्य कार्यकारी डॉ. नरेश गिते यांनी अचानक या केंद्राला भेट देऊन अंदाजपत्रकात नमूद कामांची पाहणी केली असता अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. अंदाजपत्रकात नमूद करण्यात आलेल्या उपकेंद्राच्या गळतीबाबत स्पष्टीकरण करताना यंत्रणेची एकच तारांबळ उडाली. गळती शोधण्यासाठी डॉ. गिते यांनी चक्क उपकेंद्राच्या इमारतीवर चढून पाहणी केली असता त्यांना तेथे गळतीसारखे काहीही आढळले नाही. सदर उपकेंद्रात प्रस्तावित केलेल्या कामांची तपासणी करून नव्याने अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश डॉ. गिते यांनी यंत्रणेला दिले. राष्ट्रीय ग्रामीण अभियानांतर्गत आरोग्य विभागात पायाभूत सुविधा विकास कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
या कक्षाच्या वतीने जिल्ह्यातील रुग्णालयांमधील कामांचे नूतनीकरण करण्यात येते. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत दाभाडी येथील आरोग्य उपकेंद्राच्या (क्र.२) नूतनीकरणासाठी अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. डॉ. गिते यांनी प्रत्यक्ष उपकेंद्राला भेट देऊन तसेच अन्य अभियंत्यांकडून अंदाजपत्रकाबाबत खात्री केली असता जादा रकमेचे अंदाजपत्रक सादर केल्याचे निदर्शनास आले.
विशेष म्हणजे उपकेंद्रास गळती असल्याचे अंदाजपत्रकात नमूद असताना गळती नेमकी कोठे होते याचे उत्तर संबंधिताना देता आले नाही. उपकेंद्रामधील आरोग्य सेविकेच्या निवासस्थानी जाऊन डॉ. गिते यांनी माहिती घेतली असता त्यांनी इमारत गळत नसल्याचे सांगितले.
इमारतीवर चढण्याची कसरत
च्आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीत गळती होत असल्याचे सांगितल्याने डॉ. गिते यांनी इमारतीवर चढून पाहणी करण्याचा निर्णय घेतला. मात्र इमारतीवर चढण्यासाठी जिना नसल्याने तसचे शिडी उपलब्ध नसल्याने त्यांना वरती चढता येत नव्हते; मात्र त्यांनी मोठा स्टूल मागवून स्लॅबला धरून ते इमारतीवर चढले आणि त्यांनी गळतीच्या ठिकाणाची पाहणी केली; मात्र तेथे काहीच आढळून आले नाही. याबाबत उपअभियंता व शाखा अभियंता यांना नव्याने मूल्यांकन करण्याचे आदेश देण्यात आले.

Web Title: Suitable health sub-centers show lacerations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.