सुजात आंबेडकरांनी घेतली मराठा आंदोलकांची भेट
By Sandeep.bhalerao | Published: November 9, 2023 04:14 PM2023-11-09T16:14:06+5:302023-11-09T16:14:37+5:30
नाशिकच्या शिवतीर्थावर सकल मराठा समाजाचे मराठा साखळी आंदोलन सुरू आहे.
नाशिक : आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या ५८ दिवसांपासून साखळी उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांची गुरुवारी (दि. ९) वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी नाशिकमध्ये भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा असल्याचे सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी वंचित आघाडीची भूमिका असून, आम्ही सोबत आहोत, असा शब्द यावेळी त्यांनी मराठा कार्यकर्त्यांना दिला.
नाशिकच्या शिवतीर्थावर सकल मराठा समाजाचे मराठा साखळी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास बसलेल्या आंदोलकांना भेटून बाळासाहेब आंबेडकर यांनी याआधीच मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिला आहे, असे सुजात आंबेडकर यावेळी म्हणाले. आंदोलक चंद्रकांत बनकर व प्रवक्ते राम खुर्दळ यांनी मराठा समाजाच्या शिक्षण व रोजगाराच्या मूलभूत आरक्षणासाठी आम्ही आंदोलन करीत असल्याचे सांगितले.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे सुजात प्रकाश आंबेडकर यांनी "आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या भूमिकेत कायम आहोत, मराठा समाजाला आमची कायम साथ आहे, असा शब्द दिला. यावेळी आंदोलक शरद लभडे, हिरामण अण्णा वाघ, ॲड. कैलास खांडबहले, सुधाकर चांदवडे, विकी गायधने, संदीप हांडगे, दिनेश सावंत, जगदीश शेजवळ यांसह वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार, शहराध्यक्ष अविनाश शिंदे यांसह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.