सुजित लोट खुनातील आरोपीस जन्मठेप
By admin | Published: March 27, 2017 06:58 PM2017-03-27T18:58:37+5:302017-03-27T18:58:37+5:30
पंचशीलनगरमधील सुजित श्याम लोट (१९) या युवकाचा दोन वर्षांपूर्वी जुन्या भांडणाच्या कारणावरून चाकूने वार करून खून
नाशिक : नाशिक-पुणे रोडवरील पंचशीलनगरमधील सुजित श्याम लोट (१९, पंचशील क्लासिक अपार्टमेंट, शिवाजीनगर नाशिक-पुणा रोड) या युवकाचा दोन वर्षांपूर्वी जुन्या भांडणाच्या कारणावरून चाकूने वार करून खून करणारा आरोपी चरण नाथा उजागरे (२१, समतानगर, आगरटाकळी रोड, नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ सी़ शर्मा यांनी सोमवारी (दि़२७) जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या या खटल्यात सरकारी वकील शिरीष कडवे यांनी बारा साक्षीदार तपासले़
या खून खटल्याबाबत अधिक माहिती अशी की, मयत सुजित श्याम लोट याने घटनेच्या काही दिवसांपूर्वी आरोपी चरण उजागरे यास चापट मारली होती़ त्याचा राग उजागरेच्या मनात होता़ ११ एप्रिल २०१५ रोजी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास सुजित श्याम लोट व त्याचा मित्र राजू बाबूराव दाणी हे टाकळीरोडवरील टपरीवर सिगारेट पित असताना उजागरे तिथे आला़ याच ठिकाणी सुजितचा भाऊ पवन अशोक लोट यास फोन करून बोलावून घेण्यात आले होते़
या टपरीवर लोट व उजागरे यांच्यामध्ये जोरदार भांडण सुरू असतानाच उजागरेने हातातील चॉपरने सुजित लोटच्या छातीवर व पोटावर सपासप वार केले व दुचाकीवरून पळून गेला़ यानंतर पवन लोट व राजू दाणी यांनी सुजितला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात चरण उजागरेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़
न्यायाधीश शर्मा यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खून खटल्यात सरकारी वकील शिरीष कडवे यांनी बारा साक्षीदार तपासले़ साक्षीदार व प्रत्यक्षदर्शींनी दिलेली साक्ष व समोर आलेले पुरावे ग्राह्य धरत आरोपी चरण उजागरे यास जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली़