सुलोचनादिदींना दादासाहेब फाळके पुरस्काराच्या मागणीसाठी नाशिकमध्ये स्वाक्षरी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 06:55 PM2019-02-05T18:55:46+5:302019-02-05T18:57:20+5:30
चित्रपट सृष्टीचे भिष्माचार्य दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादिदी यांना देण्यात यावा अशी मागणी नॅशनल युनियन आॅफ जर्नलिस्ट्स महाराष्ट्र व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नाशिक यांच्यातर्फे करण्यात आली आहे. या मागणीसाठी मंगळवारी (दि.५) परशूराम सायखेडकर नाट्यगृहच्या आवारात दोन्ही संघटनांतर्फे दिवसभर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : चित्रपट सृष्टीचे भिष्माचार्य दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादिदी यांना देण्यात यावा अशी मागणी नॅशनल युनियन आॅफ जर्नलिस्ट्स महाराष्ट्र व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नाशिक यांच्यातर्फे करण्यात आली आहे. या मागणीसाठी मंगळवारी (दि.५) परशूराम सायखेडकर नाट्यगृहच्या आवारात दोन्ही संघटनांतर्फे दिवसभर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. दिवसभरात सुमारे साडेपाचशे नागरिकांनी या स्वाक्षरी मोहीमेत सहभाह नोंदवून सुलोचना दिदींना पुरस्कार मिळण्याच्या मागणीचे समर्थन केले.
भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविलेल्या प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींनी ४०० हून अधिक हिंदी- मराठी आणि इतर भाषातील सिनेमात कसदार व सशक्त भूमिका साकारलेल्या आहेत. कृष्णधवल चित्रपटांच्या जमान्यापासून अगदी ऐंशीच्या दशकापर्यंत मराठी आणि हिंदी पडद्यावर सुलोचनादीदीचे नाव झळकले. त्यामुळेच त्यांच्या नावाचा आणि कामगिरीचा उल्लेख केल्याशिवाय चित्रपटसृष्टीची वाटचाल अधुरीच राहते. त्यांना यापूर्वी पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण हे सन्मान मिळालेले आहेत. त्याचबरोबर फिल्मफेअरचा लाईफटाईम अचिव्हमेंट अॅवार्ड आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. मात्र चित्रपटसृष्टीमध्ये आपले अवघे आयुष्य खर्ची घालूनही त्यांना अद्याप केंद्र शासनाचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला नसल्याने नाशिकमध्ये मंगळवारी दिवसभर चित्रपट महामंडळाचे विभागीय अध्यक्ष रवि बारटक्के, रवि साळवे, रफिक सय्यद, राजेश जाधव आदींनी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
(फोटो-०५पीएचएफबी६१)- सुलोचना दिदी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबविताना रवि साळवे, रवि बारटक्के, रफिक ससय्यद आदी