हप्ता भरुनही पीक विम्याची रक्कम मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 04:15 PM2020-03-20T16:15:31+5:302020-03-20T16:15:42+5:30
गोंधळाची स्थिती : मोसम खोऱ्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा
जायखेडा : दीर्घ प्रतीक्षेनंतर मका, बाजरी, व डाळिंब या पिकांच्या पिक विम्याची रक्कम अनेक शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. मात्र मोसम खोºयातील काही गावांतील शेतक-यांनी संपूर्ण हप्ता भरूनही त्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम अद्याप जमा झालेली नाही. त्यामुळे या शेतक-यांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला असून, बँक खात्यात पैसे जमा होण्याची प्रतीक्षा केली जात आहे.
अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना विमा सरंक्षण देण्यासाठी, शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी प्रधानमंंत्री पिक विमा योजना राज्यात राबविली जाते. परंतु प्रत्येकवर्षी विमा कंपनीकडून शेतक-यांना आधार मिळण्याऐवजी दिशाभूल केल्याचे आरोप, शेतकरी तसेच शेतकरी संघटनांनी केले आहेत. वारंवार येणा-या आपत्तींमुळे शेतक-यांची आर्थिक स्थिती सुद्धा बिकट झाली आहे. पिक विम्याच्या रकमेतून शेतकºयांना काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. मका, बाजरी, डाळिंब आदी पिकासाठी तालुक्यातील ३५ हजार ६४० शेतक-यांनी विमा काढला होता. यापोटी ३९ कोटी २० लाख ६५ हजार रु पये एवढी पिक विम्याची रक्कम तालुक्याला मिळाली आहे. सदर पिक विम्याची रक्कम कंपनीकडून शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे. परंतु यामध्येही अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती असून, काही गावांमध्ये शेतकºयांनी पिक विम्याचा हप्ता भरूनही त्यांच्या खात्यावर रक्कम जमाच झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.