शेळ्या पाळणारी सुमनबाई बनली मोहेगावची कारभारीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 07:23 PM2021-02-08T19:23:12+5:302021-02-09T00:47:09+5:30
नांदगाव : महिनाभर सुरू असलेली ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम संपली आणि सरपंचपदाची लगबग सुरू झाली. आरक्षण पडले आणि 'तिचे' नशीब फळफळले. लोकशाहीचे फळ मोहेगावच्या सुमनबाईपुढे अलगद येऊन पडले. अनुसूचित जातीसाठी राखीव सरपंचपदाचा अनपेक्षित लाभ पदरी पडल्याने शेळी पालन करणारी व प्रसंगी शेतावर मजुरी करणारी महिला सुमनबाई आनंदित झाल्या. पाटलाची सून नसली तरी, मोहेगावची प्रथम नागरिक होण्याचा मान तिला मिळाला.
अनुसूचित जातीसाठी राखीव झालेल्या सरपंचपदाची चिठ्ठी निघाली. तेव्हा या पदावर एकमेव दावेदार असलेली सुमनबाई मात्र आपल्या झोपडी समोरच्या गोठ्यात शेळीचे दूध काढत होती. तिचे माहेर नांदगाव तालुक्यातल्या भौरी गावाचे. माहेरी असताना रानात शेळ्या चारायला जायची आणि सासरीसुद्धा तसेच जीवन वाट्याला आले. परिस्थितीमुळे चार बुकंही शिकू न शकलेली 'ती' निरक्षरच राहिली. सरपंचपदाच्या सहीचा अधिकार.... होय... सरपंचपदाचा अंगठा तिच्या नशिबाने तिला मिळाला.
आपल्याला गावचे सर्वात मोठे पद मिळाले, याची तिला जाणीव आहे. गावाचा विकास कसा करायचा, याचे मोठे ज्ञान नसले तरी, आपल्या आदिवासी वस्तीत रस्ते, गटारी झाल्या पाहिजेत, दिवाबत्ती पेटली पाहिजे, असे तिला वाटते.
गाव विकासाची तळमळ
विकासाच्या नावाने बोट मोडता-मोडता आरक्षणामुळे अंगठ्याचा ठसा किती महत्त्वाचा झाला आहे, याची जाणीव तिला झाली असली, तरी तिच्या अंगठ्याच्या जोरावर सत्तेत आलेल्या मंडळींनी गावचा विकास करावा, असे तिला वाटले, तर ते वावगे ठरू नये. गाव विकासाची तळमळ तिच्या प्रत्येक शब्दांतून व्यक्त होते. एकलव्याला आदर्श मानून त्याची पूजा करणारी सुमनबाई व तिची जातकुळी. गुरुदक्षिणेपोटी अंगठा गमवावा लागणाऱ्या एकलव्याची वेळ तिच्यावर येऊ नये. गावच्या विकासासाठी तिचा अंगठा उमटला जावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.