सुमंत गुजराथी यांचे निधन
By admin | Published: February 2, 2016 10:34 PM2016-02-02T22:34:31+5:302016-02-02T22:36:30+5:30
सुमंत गुजराथी यांचे निधन
सिन्नर : येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व इतिहास अभ्यासक, दलितमित्र सुमंत दत्तात्रय गुजराथी (८७) यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
बुधवारी सकाळी ९ वाजता विजयनगर येथील निवासस्थानाहून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. राज्य परिवहन मंडळात लिपीक म्हणून काम करताना ग्राहक पंचायत, संस्कार भारती, सिन्नर सार्वजनिक वाचनालय, इतिहास संशोधन मंडळ, विश्व हिंदु परिषद, साहित्य रसास्वाद मंडळ आदी अनेक संस्थांशी त्यांचा सक्रीय संबंध होता.
सिन्नर-अकोले तालुक्याच्या सरहद्दीवरील विश्रामगडावर छत्रपती शिवरायांच्या वास्तव्याच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शिवपदस्पर्श दिन सुरु करण्यात त्यांचा पुढाकार होता. वावी येथील शाहिर वरदी परशराम व नांदूरशिंगोटे येथील क्रांतीवीर भागोजी नाईक यांची स्मारके त्यांच्या प्रयत्नातून साकारली. रक्षाबंधन निमित्ताने सीमेवरील जवानांना राख्या पाठविण्याचे अभियान कारगील युध्दापासून त्यांनी सुरु केले. गोंदेश्वर मंदिर प्रांगणात दरवर्षी रथसप्तमीस सुर्य नमस्कार स्पर्धांचे आयोजन करण्याचा उपक्रम अनेक वर्षांपासून त्यांनी सातत्याने केला. थोरल्या बाजीरावांचा जन्म डुबेरे येथे झाल्याच्या घटनेस त्यांनी इतिहासकारांकरवी पुष्टी मिळविली. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत सिन्नर वाचनालयात झालेला कार्यक्रम त्यांचा अखेरचा सार्वजनिक कार्यक्रम ठरला. अखेरपर्यंत ते सामाजिक उपक्रमांत कार्यरत होते.
मंगळवारी सायंकाळी पायी चालत असतांनाच चक्कर येऊन रस्त्यात कोसळल्याने त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. तत्पूर्वी ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. (वार्ताहर)