सुमेधा देसाई यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:49 AM2019-04-29T00:49:58+5:302019-04-29T00:50:13+5:30
‘भिन्न षड्ज’ रागातील बंदिशींसह विविध भावगीते आणि नाट्यगीतांच्या बहारदार शैलीतील गायनाने ख्यातनाम गायिका सुमेधा देसाई यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
नाशिक : ‘भिन्न षड्ज’ रागातील बंदिशींसह विविध भावगीते आणि नाट्यगीतांच्या बहारदार शैलीतील गायनाने ख्यातनाम गायिका सुमेधा देसाई यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
प्रा. अरुण वसंत दुगल यांच्या सातव्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या शिष्या सुमेधा देसाई यांच्या सुमधूर गायनाने आयोजित संगीत सभेत रंगत भरली. प्रारंभी विद्या दुगल, अभिराम दुगल, हर्षदा दुगल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आल्यानंतर देसाई यांनी ‘भिन्न षड्ज’ रागातील बंदिशींसह विविध भावगीते आणि नाट्यगीतांचे सादरीकरण करताना सादर केलेल्या ‘देवाघरचे ज्ञात कोणाला’ भावगीताला सरिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. देसाई यांनी भिन्न षड्ज रागाने गायनाला प्रारंभ कला. त्यात त्यांनी विलंबित तालातील ‘मोरे घर आए बलमा’ व ‘जारे जारे जा कागवा’ या पंडित अभिषेकी यांच्या स्वरचित बंदिशी पेश करीत मने जिंकली.