सभापती आडके यांची सारवासारव ; दरवाढीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 01:08 AM2018-09-27T01:08:18+5:302018-09-27T01:08:40+5:30
कालिदास कलामंदिरचे भाडे किती ठेवावे, याबाबत हातात निर्णय असताना अल्पसाथ देणाऱ्या सभापती हिमगौरी आडके यांनी नंतर मात्र आता दरवाढीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी केली आहे. बुधवारी (दि. २६) सकाळी त्यांनी जनस्थानच्या कलावंतांना बोलावून चर्चा केली आणि सायंकाळी नाट्य परिषदेलाही दरवाढीचा फेरविचार करण्याचे आश्वासन दिले.
नाशिक : कालिदास कलामंदिरचे भाडे किती ठेवावे, याबाबत हातात निर्णय असताना अल्पसाथ देणाऱ्या सभापती हिमगौरी आडके यांनी नंतर मात्र आता दरवाढीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी केली आहे. बुधवारी (दि. २६) सकाळी त्यांनी जनस्थानच्या कलावंतांना बोलावून चर्चा केली आणि सायंकाळी नाट्य परिषदेलाही दरवाढीचा फेरविचार करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे कलावंत आणि पालिका वर्तुळातही उलट-सुलट चर्चा होत आहे. कालिदास कलामंदिरचे नूतनीकरण केल्यानंतर मनपाने त्याचे दर चार हजारांवरून तीस हजार रुपयापर्यंत नेले असून, आॅर्केस्ट्राचे दर चाळीस हजारांपर्यंत नेले होते. या प्रस्तावाला कलावंतांनीही कडाडून विरोध केला. हा प्रस्ताव स्थायी समितीवर मांडण्यात येणार असल्याने अंतिमत: लोकप्रतिनिधीच निर्णय घेतील त्यामुळे दिलासा मिळेल, अशी कलावंतांना अपेक्षा होती; परंतु गेल्या आठवड्यात स्थायी समितीने सर्वाधिकार सभापतींना दिल्यानंतर त्यांनी प्रशासनाचीच री ओढत अल्पसे दर कमी केले त्यामुळे पुन्हा एकदा कलावंतांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात आयुक्तांना तीन दिवसांचा अल्टिमेटम कलावंतांनी दिल्यानंतर बुधवारी (दि. २६) सभापती हिमगौरी आडके यांनी जनस्थानच्या निवडक कलावंतांना बोलावून घेतले आणि चर्चा केली. यावेळी तांत्रिक बाजू समजावून घेत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. सदानंद जोशी, विनोद राठोड यांच्यासह अन्य कलावंत यावेळी उपस्थित होते. दुपारी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने अध्यक्ष रवींद्र कदम यांच्या नेतृत्वाखाली हिमगौरी आडके यांना निवेदन देण्यात आले. यावेळी श्रीकांत बेणी, सुनील ढगे, जयप्रकाश जातेगावकर, राजेंद्र जाधव, उमेश गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
नि:शुल्क कार्यक्रम असेल तर?
महापालिकेने कालिदासचे दर ठरवितानाच पाचशे रुपयांपेक्षा कमी आणि त्यापेक्षा जास्त असे दोन निकष लावले आहेत. मात्र, गायन, नृत्य किंवा अन्य अनेक कार्यक्रम मोफत असतात मग भाडे ठरविताना त्यांना कोणता निकष लावणार? असा प्रश्न जनस्थानच्या कलावंतांनी उपस्थित केला.