आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा
By admin | Published: March 6, 2017 01:25 AM2017-03-06T01:25:33+5:302017-03-06T01:25:46+5:30
नाशिक : मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच तपमानाचा पारा हळूहळू चढू लागल्याने उन्हाच्या चटक्यातही हळूहळू वाढ होत उन्हाळा येऊन दाखल झाला आहे.
नाशिक : मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच तपमानाचा पारा हळूहळू चढू लागल्याने उन्हाच्या चटक्यातही हळूहळू वाढ होत उन्हाळा येऊन दाखल झाला आहे. तपमानातही बदल होण्यास सुरुवात झाली आहे. तप्त दुपार आणि गरम हवा शरीरावरही परिणाम करतेच. त्यामुळे उन्हाळा आल्यानंतर तुमच्या जेवणाच्या दिनचर्येतही बदल गरजेचा आहे.
उन्हाळ्यात अधिक तेलकट खाणे नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे संतुलित आहाराची आवश्यकता असते. दिवसाची सुरुवात एक लीटर पाणी किंवा लिंबू पाण्याने करा, असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दिवसभर जास्तीत जास्त पाणी पिणेही आवश्यक असते. निसर्गाने प्रत्येक ऋतू भिन्नरितीने बनविला आहे. पण त्यासोबतच प्रत्येक ऋतूचे फायदेही देऊ केले आहेत. थंडीत शरीरात उष्णता उत्पन्न करणाऱ्या पालेभाज्या, फळे तर उन्हाळ्यात पचनासाठी हलके-फुलके खाद्यपदार्थ, फळे आणि पेय पदार्थ निसर्गापासून आपल्याला मिळतात. त्यात टरबूज, काकडी, खरबूज, द्राक्षे, लिंबू, स्ट्रॉबेरी, सफरचंद, आंबे ही फळे आहेत.
या सर्वांमुळे फक्त शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते असे नाही तर शरीराला थंड बनवून पोषणही देतात. त्यातून मिळणारे व्हिटॅमिन्स आणि खनिजे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवितात आणि त्वचेलाही सुंदर बनवितात. यांचा वापर कच्चे सलाड किंवा ज्यूसच्या रूपात किंवा काही शिजवून (काकडी, कोबी) खाऊ शकतो. त्याव्यतिरिक्त उन्हाळ्यात, जिरे, शोप, वेलची हे मसाले तसेच कैरीचे पन्हे, पुदिना, फळाचा रस, सरबते, चटणी, जलजिरा आदि पदार्थही वस्तूही शरीरासाठी अनुकूल असल्याने अशा पदार्थांचा दैनंदिन आहारात समावेश करण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञ व आहार तज्ज्ञांकडून देण्यात येतो. (प्रतिनिधी)