देवळा तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली
By Admin | Published: May 12, 2017 11:15 PM2017-05-12T23:15:41+5:302017-05-12T23:16:47+5:30
खामखेडा : गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून अचानक उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या वेळेस रस्ते ओस दिसून येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामखेडा : गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून अचानक उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या वेळेस रस्ते ओस दिसून येत आहेत. चालू वर्षी बऱ्यापैकी पाऊस झाल्याने साधारण फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापर्यंत बऱ्यापैकी थंडी होती. मार्च महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली होती. परंतु गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून अचानक वातावरणात बदल झाला. ढगाळ वातावरण तयार होऊन उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्याने प्रचंड प्रमाणात उकाडा होत आहे. सकाळी ८ वाजेपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन कामकाज बदललेले दिसून येत आहे. सध्या सर्वत्र शेतीची हंगामातील कामे अंतिम टप्प्यात आहेत. विशेष म्हणजे, उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम जवळपास संपला असून, कांदा चाळीत साठवणुकीचे काम अंतिम टप्प्यात असल्याने शिवारात सर्वत्र कांदा साठवणुकीचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. खामखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसामुळे जमिनीतील उष्णता बाहेर निघून उकाडा निर्माण झाल्यानेघरात बसणे मुश्कील झाले आहे. गायी, बकऱ्या, मेंढ्या चारणारे गुराखी सकाळी लवकर आपली जनावरे चारण्यासाठी नेऊन दुपारी नदीकिनारच्या किंवा शेतातील झाडाच्या सावलीत आपली शेळ्या, मेंढ्या आदी जनावरे उभे करून आराम करणे पसंत करत आहेत.
कडक उन्हामुळे शिवारातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. या कडक उन्हामुळे पिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासू लागली आहे. सकाळी पिकांना पाणी भरल्यानंतर या कडक उन्हामुळे सायंकाळी जमीन कोरडी दिसून येत आहे. तेव्हा पिके कशी जतन करावी, हा प्रश्न आतापासून शेतकऱ्याला पडला आहे.