मालेगाव परिसरात उन्हाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:25 AM2021-03-13T04:25:17+5:302021-03-13T04:25:17+5:30
मालेगाव : गेल्या आठवड्यापासून मालेगाव परिसरातील उन्हाचा पारा ३८ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. उन्हाचा पारा कायम असल्यामुळे नागरिकांचे हाल ...
मालेगाव : गेल्या आठवड्यापासून मालेगाव परिसरातील उन्हाचा पारा ३८ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. उन्हाचा पारा कायम असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. दुपारच्या सत्रात कडक ऊन लागत असल्यामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, रुमाल, गॉगल, छत्री आदींचा वापर केला जात आहे. ठिकठिकाणी रसवंती गृहे फुलू लागली आहेत.
-------------------
मोकाट श्वानांचा वाढता उपद्रव
मालेगाव : शहर परिसरात मोकाट श्वानांच्या संख्येत वाढ झाली आहे. रस्त्यांवर झुंडीझुंडी फिरत आहेत. मोकाट श्वानांच्या हल्ल्यात बालके व नागरिक जखमी होत आहेत. मोकाट श्वान रस्त्यांवरून धावत असल्याने दुचाकींमध्ये अडकून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
-----------------------------
विजेच्या लपंडावामुळे शेतकरी हैराण
मालेगाव : यंदा रब्बी हंगाम चांगला आला असताना व शेतीशिवारातील विहिरींना बऱ्यापैकी पाणी असताना वीज वितरण कंपनीकडून भारनियमन केले जात आहे. यामुळे शेती पिकांना पाणी देता येत नाही. वीज उपकेंद्रामधील बिघाड, कमी दाबाने वीजपुरवठा, थकबाकीमुळे वीज जोडणी खंडित करण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
---------------------------------
महिलांची वाळवणासाठी लगबग
मालेगाव : तालुक्यातील ग्रामीण भागात वाळवणासाठी महिलांची लगबग दिसून येत आहे. कुरडई, पापड, शेवाळ्या, मसाल्याचे पदार्थ करण्यासाठी महिलांची धावपळ होत आहे. सावलीचा आधार घेऊन वाळवण केले जात आहे. वाळवणासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या दरात वाढ झाल्याने आर्थिक बजेट सांभाळत महिला वाळवण करीत आहेत.
तालुका सचिवपदी अमोल अहिरे
मालेगाव : येथील पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या सचिवपदी अमोल राजाराम अहिरे यांची तर मालेगाव उपतालुका अध्यक्षपदी सिद्धार्थ रोहिदास अहिरे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवान आढाव यांनी तसे नियुक्तीपत्र अहिरे यांना दिले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष नितीन बोराळे व पदाधिकारी उपस्थित हाेते.
कांद्याच्या दरात घसरण
मालेगाव : कांद्याच्या दरात तब्बल दीड हजाराने घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कसमादे परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादित केला जातो. जिल्ह्यातील बाजार समिती तसेच उपबाजार समित्यांमध्ये गेल्या आठवड्यात कांद्याचे दर कोसळले आहेत. लाल व उन्हाळी कांद्याची आवक वाढली असताना कांद्याचे दर एकदम कमी झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.