उन्हाळ कांदा चाळीतच होतोय खराब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:14 AM2021-09-03T04:14:47+5:302021-09-03T04:14:47+5:30
पाटोदा/मानोरी : कांद्याचे माहेर घर म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या दरात मागील काही दिवसांपासून घसरण होत चालली ...
पाटोदा/मानोरी : कांद्याचे माहेर घर म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या दरात मागील काही दिवसांपासून घसरण होत चालली असून, भाववाढीच्या अपेक्षेने साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा चाळीतच खराब होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडून गेले आहे. यंदा उन्हाळा कांद्याच्या बियाणात फसगत झालेली असताना काही ठिकाणी कांदा सुरुवातीला जमिनीतच सडून जाण्याचा प्रकार घडला होता. गुरुवारी लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी १५०० रुपयाच्या दरम्यान भाव मिळाला असून, केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने भाव वाढीसाठी प्रयत्न करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. यंदा अवकाळी पावसामुळे रोपांसह बियाणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर अनेक ठिकाणी उन्हाळ कांद्याची उशिरा लागवड शेतकरी वर्गाकडून करण्यात आली होती. मात्र उशिरा केलेल्या कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची बियाणांमध्ये मोठ्या प्रमाणात फसगत झाल्याने कांदा लागवडीनंतर काही दिवसांतच कांद्यांना डोंगळे उगवल्याचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून आले होते. त्यामुळे बियांणामध्ये फसगत झाल्याने कांद्याचे खराब होण्याचे प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती.
--------------------
कांद्यांना डोंगळे
कांद्याना डोंगळे आल्याने यंदा कांदा साठवावा की नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यासमोर उभी राहिली होती. डोंगळे आलेले कांदे आधीच पाण्याविना करपून चालले असताना त्यात डोंगळ्यांचे प्रमाण अधिक असल्याने उन्हाळ कांदा साठवून ठेवल्यास कांदा लवकर खराब होण्याची धास्ती शेतकरी वर्गासमोर उभी राहिली होती मात्र भाववाढीच्या अपेक्षेने ठेवलेले हे कांदे लवकरच खराब होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने कांद्यांना केलेल्या मशागतीचा उत्पादन खर्च फिटनेदेखील सध्या शेतकऱ्यांना दुरापास्त होतो की काय अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याचे दर सरासरीच्या तुलनेत ३०० ते ५०० रुपयांनी कांदा साठवून ठेवावा की अल्प दरात विकावा, अशी गत शेतकऱ्यांची झाली आहे.
------------------
यंदा मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाची बियाणांमध्ये फसगत झाल्याने उन्हाळ कांद्याचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यात कांद्यांना दरही मिळत नसल्याने कांदा तसाच साठवून ठेवल्यास जास्त प्रमाणात खराब होणार असून, शासनाने भाववाढीसाठी तत्काळ नियोजन करणे गरजेचे झाले आहे.
- मच्छिंद्र जाधव, तालुकाध्यक्ष, युवा स्वाभिमानी शेतकरी संघटना, येवला