उन्हाळी कांदा साठवणुकीवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 05:50 PM2019-03-14T17:50:38+5:302019-03-14T17:51:22+5:30
खामखेडा : खामखेडा परिसरात उन्हाळ कांदा साठवणूकीकरीता शेतकरी धावपळ करीत आहे. सध्या कसमादे भागात कांदा चांगला पिकला आहे. गेल्या ...
खामखेडा : खामखेडा परिसरात उन्हाळ कांदा साठवणूकीकरीता शेतकरी धावपळ करीत आहे. सध्या कसमादे भागात कांदा चांगला पिकला आहे. गेल्या तीन-चार वर्षापासून गरपीट, अवकाळी पाऊस व ह्या वर्षी दुष्काळाच्या दुष्टचक्र मागे लागलेले असतांना या सर्व संकटावर मात करु न कसा बसा कांदा पिकवला. आणि हाच कांदा आता बाजारात पाचशे ते आठशे भावात विकला जातो आहे. त्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. कांद्याचे चांगले उत्पादन मिळाले असुन बाजारभाव मिळत नसल्याने कांदा साठवणुक केल्याशिवाय पर्याय नाही.
गेल्या वर्षी उन्हाळी कांद्याचे भरपूर प्रमाणात उत्पादन झाल्याने तेव्हा कांदा काढणीच्या वेळेस आज ज्या भावात कांदा विकला जात आहे.त्याचं भावात गेल्या वर्षी विकला जात होता, तेव्हा पुढे भाव वाढ होईल या आशेवर शेतकऱ्याने चाळीत कांदा साठवणूक केली होती. परंतु पूर्ण वर्षभर कांद्याच्या भावात वाढ झाली नाही. कांद्याच्या भावात वाढ होईल या आशेवर नोव्हेंबर मिहन्यापर्यत ठेवला परंतु भाव वाढला नाही. तेव्हा कांदा चाळीत सडला. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली. हा कांदा चाळीतून काढून उकिरड्यावर फेकावा लागला. तरीही या वर्षी मोठ्या हिमतीने शेतकºयाने कांद्याची लागवड केली आहे. या कांदापिकासाठी उधार, उसनवर पैसे आणून उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे. परंतु पाहिजे तसा भाव नसल्याने तो चाळीत ठेवत आहे.
या वर्षी चांगल्या वातावरणामुळे अल्पसा पाऊस असुनही शेतकरी वर्गाला कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर साधले आहे. मात्र उत्पादन खर्च हजार रु पये एकरी असतांना कांद्याला मिळत असलेल्या सरासरी पाचशे ते आठशे रु पये बाजार भावामुळे शेतकरी वर्ग कांदा साठवणुकीस जोर देऊ लागला आहे. मातीमोल दरात कांदा देण्यापेक्षा शेतकरी साठवण करण्यास अधिक पसंती देत असल्याने सध्या खामखेडा परिसरात कांदा साठवणूक करतानाचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.
देवळा तालुक्यातील गावांना सलग चार वर्षांपासून नैसर्गिक संकटाने ग्रासले आहे. गारपीट, अवकाळी पाऊस व आता पाणीटंचाईमुळे उन्हाळी कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याने कांदा पिकास फटका बसला आहे.
गिरणा परिसरातील खामखेड, भऊर, बगडू, पिळकोस, बेज, भादवण, विसापूर या परिसरामध्ये उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. दरवर्षी सर्वसाधारण शेतकरी दोनशे ते तीनशे क्विंटल कांद्याची चाळीत साठवणूक करत होता. मात्र ह्या वर्षी अल्पश्या पावसावर लागवड केलेल्या कांद्यास अल्प बाजार भाव मिळत असल्याने शेतकरीवर्गाने कांदा साठवणुकीवर भर दिली आहे.
या वर्षी कांदा पिकास पोषक वातवरण असल्याने शेतकरी वर्गास अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न साधल्याने साठवणुकीची क्षमते पेक्षा अधिक उत्त्पन मिळाल्याने तशेच सध्या कांद्यास सरासरी चारशे ते सातशे रु पयापर्यंत बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी कांदा साठवणूकीवर भर देऊ लागला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकी साठी कायम स्वरूपी केलेल्या सोयी कांदा चाळी भरून गेल्याने खामखेडा, भऊर, सावकी, विठेवाडी परिसरात तात्पुरते कुड व अन्य सोयी उभारून कांदा साठवण्याची तयारी करीत आहे.