जिल्ह्यात कांद्याला उन्हाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 09:50 PM2021-03-14T21:50:18+5:302021-03-15T00:46:09+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी व मार्च महिन्याच्या सुरुवातीला उन्हाच्या तीव्रतेमुळे कांदा पिकाला तडाखा बसत आहे. उन्हाच्या ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी व मार्च महिन्याच्या सुरुवातीला उन्हाच्या तीव्रतेमुळे कांदा पिकाला तडाखा बसत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे कांदे लवकर परिपक्व होऊ लागल्याने वणी व दिंडोरी बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू होऊ लागली आहे. परिणामी दरात घट होण्याची शक्यता व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
सध्या उन्हाळी कांद्याचा हंगाम सुरू झाला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने त्याचा परिणाम कांदा पिकावर झाल्याने कांदा पक्का झाला. परिणामी घाऊक बाजारात कांद्याच्या दरात घट झाल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.
१ मार्च २०२१ ते १० मार्च या कालावधीत विक्रमी वाहनांची आवक
१) जिल्हा परिषद वाहने :- १०६० कांदा वाहतुकीसाठी वापरात आली.
२) ट्रॅक्टर :- १४२१ ,कांदा वाहतुकीसाठी वापरात आले.
दि. १ ते १० मार्चपर्यंत वणी व दिंडोरीत आवक व भाव
लाल कांदा आवक :- १३००० क्विंटल. (भाव ८०० ते २८६१ रुपये)
उन्हाळी कांदा:-२१५०० क्विंटल (९०० ते २८६० रुपये)
गोल्टी कांदा (२०० ते २५०० रुपये)
एकूण आवक :- ३४५०० क्विंटल
कांद्याची आवक दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत असून अत्यंत मेहनत करून, अतिशय महागडी औषधे खरेदी करूनही भाव मिळत नसेल तर विविध बँक, सोसायटी, पतसंस्थांचे कर्ज फेडायचे कसे अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
येवला तालुक्यात पिके कोमेजली
मानोरी : एकीकडे कांद्याच्या दरात घसरण, दुसरीकडे पालखेड आवर्तनाकडे नजरा तर तिसरीकडे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने येवला तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच त्रेधा उडाली आहे. येवल्याच्या पश्चिम भागात विहिरींनी तळ गाठल्याने कांद्यासाठी पाणीच राहत नसल्याने वाढत्या उष्णतेमुळे कांद्याची पिके कोमेजू लागली आहेत. काही ठिकाणी पाणी आहे असून थकीत वीज बिलामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. सरकारने वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश मागे घेण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
उन्हाळी आणि लाल कांदा लागवडीत मोठ्या प्रमाणात विक्रमी वाढ झाली असून यंदा अवकाळी पावसामुळे रोपांचे नुकसान झाल्यानंतर शेतकरी वर्गाने मिळेल तेथून कांद्याची रोपे विकत घेऊन कांद्याची लागवड पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना कांद्याच्या बियाणांमध्ये फसगत झाल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे.
दरम्यान, कांद्याच्या दरात सातत्याने मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्याने उन्हाळी आणि लाल कांदा काढणीला वेग आला असून कांद्याचे दर अजून किती कमी होतील याची शाश्वती नसल्याने बाजार समित्यांत कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीला येत असून आवक दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याचे दिसून येत आहे.
उष्णता दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याने विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. उन्हाळी कांद्याला देण्यासाठी मुबलक पाणी विहिरीत येत नसल्याने शेतकरी वर्गाकडून पालखेड आवर्तन सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. उन्हाळी कांद्याला अद्यापही चार ते पाच पाणी मुबलक प्रमाणात देणे गरजेचे असून पालखेड आवर्तनातून वितरीका क्र. २१ , २५ व २८ ला आवर्तन तत्काळ सोडण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
विहिरींनी तळ गाठल्यानंतर कांद्याला पाणी भरण्यासाठी तारेवरची कसरत शेतकरी वर्गाला करावी लागत असतानाच अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने स्थगित केलेली वीज पुरवठा खंडितचा आदेश मागे घेत पुन्हा थकबाकीदार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा आदेश दिल्यानंतर शेतकरी वर्गाकडून या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वीजपुरवठा खंडित करून शेतकरी वर्गाची बोळवण होत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहेत.