उन्हाळा तापदायक : नाशिकचा पारा ४०.५ अंशांपर्यंत गेल्याने उन्हाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 02:38 PM2018-04-28T14:38:44+5:302018-04-28T14:38:44+5:30
एप्रिलचे अजून दोन दिवस शिल्लक असून, तपमानाचा पारा ४१ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नाशिक : राज्यात उष्णतेची लाट वाढली असून, कमाल तपमानाचा पारा सातत्याने चढता असल्याने नाशिककरांना यंदाचा उन्हाळा तापदायक ठरू लागला आहे. एप्रिलमध्ये तीनवेळा पारा चाळिशीपार गेल्याने नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा अनुभवयास येत आहे. गेल्या शुक्रवारी (दि.२७) हंगामातील उच्चांकी ४०.५ इतके कमाल तपमान नोंदविले गेले.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तपमान अधिक असल्यामुळे नाशिककर सध्या प्रचंड ‘हॉट एप्रिल’चा अनुभव घेत आहे. आठवडाभरापासून तपमान ३७ ते ४० अंशांच्या जवळपास राहत असल्याने प्रखर ऊन जाणवत आहे. शुक्रवारी पारा थेट ४०.५ अंशांपर्यंत गेल्याने नाशिककर घामाघुम झाले होते. एप्रिलचे दोन दिवस शिल्लक राहिले असून, मे महिना उजाडणार आहे. यामुळे तपमानाचा पारा असाच चढता राहिल्यास मे मध्ये उन्हाचा अधिक तडाखा नागरिकांना बसू शकतो.
गेल्या वर्षाचा अखेरचा आठवडा दिलासादायक
गेल्या वर्षी एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात नाशिककरांना उन्हाच्या झळांपासून काहीसा दिलासा मिळाला होता. कारण चाळिशीवर पोहचलेले कमाल तपमान अखेरच्या आठवड्यात ३६ ते ३८ अंशांच्या जवळपास होते. २० एप्रिल २०१७ रोजी कमाल तपमान ३८.४ अंश तर ३० एप्रिल २०१७ रोजी ३६.७ अंश इतके नोंदविले गेले होते. तसेच यावर्षी २७ तारखेला ४०.५ अंश तर गेल्या वर्षी याच तारखेला ३८.१ अंश इतक्या तपमानाची नोंद झाली होती. एप्रिलचे अजून दोन दिवस शिल्लक असून, तपमानाचा पारा ४१ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एका दिवसात तीन अंशांनी वाढ
गुरुवारी (दि.२६) कमाल तपमान ३७.६ अंश इतके होते. मात्र शुक्रवारी कमाल तपमानाचा पारा अचानकपणे तीन अंशांनी वर सरकला. थेय ४०.५ अंशांपर्यंत पारा आल्याने एकाच दिवसात उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली. किमान तपमान १८ अंशांवर होते. एकूणच सकाळी आठ वाजेपासून तर संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत नागरिकांनी प्रखर उन्हामुळे उकाडा सहन करावा लागला. किमान तपमान कमी राहिल्याने संध्याकाळी वारा सुटला होता, त्यामुळे रात्री नऊ वाजेपर्यंत उकाड्यापासून काहीसा दिलासा नागरिकांना मिळाला.
उच्चांकी कमाल तपमान दृष्टिक्षेपात
वर्ष - एप्रिल
२०१२ ८ एप्रिल ४०.०
२०१३ ३० एप्रिल ४०.५
२०१४ २७ एप्रिल ३९.७
२०१५ २० एप्रिल ४०.६
२०१६ १९ एप्रिल ४१.०
२०१७ १४ एप्रिल ४१.०