मेशीसह परिसरात उन्हाळ्याची चाहूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 07:31 PM2021-03-04T19:31:31+5:302021-03-05T00:36:37+5:30
मेशी : देवळा तालुक्यातील पूर्व भागातील मेशीसह परिसरात सद्या सगळीकडे कडक उन्हाळा जाणवू लागला असून उन्हाचे चटके बसत असल्याने दुपारी सर्वत्र शुकशुकाट होत आहे.
मेशी : देवळा तालुक्यातील पूर्व भागातील मेशीसह परिसरात सद्या सगळीकडे कडक उन्हाळा जाणवू लागला असून उन्हाचे चटके बसत असल्याने दुपारी सर्वत्र शुकशुकाट होत आहे.
गावांसह शेतातही माणसांची वर्दळ कमी झाली आहे. मागील वर्षी जोरदार पाऊस झाल्याने या वर्षी हिवाळा जास्त जाणवेल आणि उन्हाळा कमी जाणवेल अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु सततच्या बदलत्या हवामानामुळे हिवाळा फारसा जाणवला नाही, परंतु उन्हाळी वातावरण मार्च महिन्यातच खूपच जाणवू लागले आहे.
अजूनही विहिरींना बऱ्यापैकी पाणी आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके सर्वच जोमात आहेत. सद्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा काढणीचे कामे जोरदार सुरू आहेत. परंतु उन्हामुळे बरीचशी कामे सकाळी आणि संध्याकाळी केली जात आहेत. लग्नसराईचे दिवस असूनही उन्हामुळे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्दळ कमीच दिसत आहे.
उन्हाळा असूनही पूर्वीसारखी रसवंतीगृहे या वर्षी अतिशय कमीच दिसत आहेत. कोरोनामुळे सर्वच लघुउद्योगांवर खूपच विपरीत परिणाम झाला आहे. अजूनही उन्हाळा तीन महिने शिल्लक आहेत. यामुळे आगामी काळात तीव्रता जास्त जाणवणार आहे, या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही आवाहन केले आहे.