उन्हाच्या काहिलीने नाशिककर हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:03 PM2018-02-21T12:03:56+5:302018-02-21T13:13:47+5:30
शहरातील रसवंतीगृहे, लस्सी, ताक, ज्युस, आईस्क्रीम आदिंची दुकाने गजबजू लागली
नाशिक : शहराच्या कमाल तपमानात मागील पाच दिवसांपासून वाढ होत असून, थंडीपासून नाशिककरांची जवळपास सुटका झाली आहे. मात्र उन्हाच्या काहिलीने नाशिककर हैराण होऊ लागले आहे. शहराचे कमाल तपमान बुधवारी (दि.२०) ३४.२ अंशांपुढे सरकले, तर किमान तपमानाचा पारा ११.८ अंशांपर्यंत वाढला.
एकूणच वाढत्या कमाल तपमानामुळे शहराच्या हवामानात सुधारणा होऊ लागली आहे. यामुळे हवामानात उष्मा जाणवयास सुरुवात झाली आहे. रसवंतीगृहे, थंडपेये, आईस्क्रीम पार्लर आदिंवर नाशिककरांची लगबग पहायला मिळते आहे. स्कार्फ, टोप्या, गॉगल, रुमाल खरेदी करण्यावर आता भर दिला जात आहे. दुपारी उन्हाची तीव्रता नाशिककरांना अनुभवयास मिळते आहे. तपमान ३४.२ अंशांपर्यंत सरकल्याने उन्हाचा चटका नागरिकांना रविवारी जाणवला. उन्हाळा सुरू झाला असल्याचे चित्र शहरातील रस्त्यांवर पहावयास मिळत आहे. शहरातील विविध चौकांमध्ये झाडांखाली रसवंतीचे फिरते गुºहाळ, सरबतचे स्टॉल्स पहावयास मिळत आहे. वाढत्या तपमानामुळे थंडीची तीव्रता कमी झाली आहे. काही दिवसांपूर्वी किमान तपमानासह कमाल तपमानही घसरले होते. त्यामुळे हवेत गारवा जाणवत होता. दोन दिवसांपासून मात्र शहराचे हवामान बदलले असून, कमाल-किमान तपमान वाढू लागले आहे.