उन्हाच्या झळा वाढल्या; रस्त्यांवर शुकशुकाट
By admin | Published: February 23, 2016 11:36 PM2016-02-23T23:36:23+5:302016-02-23T23:47:25+5:30
उन्हाचा त्रास : शीतपेये दुकानांना गर्दी
पंचवटी : गेल्या आठवडाभरापासून उन्हाच्या झळा वाढल्याने दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पसरत असल्याचे चित्र सध्या पंचवटी परिसरात दिसून येत आहे. उन्हाच्या झळा वाढल्याने नागरिकांना काही प्रमाणात उकाड्याचा सामना करावा लागत आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच कडाक्याचे ऊन जाणवत असल्याने त्याचा परिणाम वाहतूक, बाजारपेठ, तसेच दैनंदिन कामकाजावर होत आहे.
दुपारी बारानंतर उन्हाचे चटके जाणवत असल्याने कामानिमित्ताने घराबाहेर पडणारे नागरिक डोक्यावर टोपी परिधान करत असल्याचे दिसून येते. वाढत्या उन्हाचा परिणाम वाहतूक वर्दळीसह हातगाडीधारक, विविध वस्तू विक्रेते तसेच फेरीवाले यांच्या व्यवसायावर काही प्रमाणात झाला आहे.
दुपारच्या वेळी उन्हाचे चटके सहन करावे लागत असल्यामुळे मुख्य रस्त्यावरची वाहतूक काहीशी मंदावल्याचे चित्र दिसून येते. एरवी भाविकांच्या गर्दीमुळे देवदर्शनासाठी भरगच्च होणारी मंदिरे उन्हामुळे दुपारच्या वेळी ओस पडत आहेत. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच नागरिकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. उन्हाच्या झळा वाढल्याने थंडगार लस्सी, ताक, मठ्ठा तसेच शीतपेय, बर्फ गोळा या वस्तूंना मागणी वाढली आहे. दुपारच्या वेळी पंचवटी परिसरातील गल्लीबोळात ऊस रस विक्रेते, आईस्क्रीम विक्रेते, बर्फ गोळे विक्रेते फिरताना दिसून येत आहेत. (वार्ताहर)