सुंदरनारायण : पहिला टप्पा जानेवारीत पूर्ण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:00 AM2019-11-13T00:00:31+5:302019-11-13T00:04:32+5:30
नाशिकच्या पुरातन आणि वारसा मंदिरांमध्ये श्री सुंदरनारायण मंदिराचा प्रामुख्याने समावेश आहे. मात्र, कालौघात या मंदिराची काहीशी झीज झाल्याने आता केंद्र सरकारच्या निधीतून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या कामाला पावसाळ्यानंतर पुन्हा प्रारंभ करण्यात आला आहे.
नाशिक : नाशिकच्या पुरातन आणि वारसा मंदिरांमध्ये श्री सुंदरनारायण मंदिराचा प्रामुख्याने समावेश आहे.
मात्र, कालौघात या मंदिराची काहीशी झीज झाल्याने आता केंद्र सरकारच्या निधीतून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या
कामाला पावसाळ्यानंतर पुन्हा प्रारंभ करण्यात आला आहे. सध्या मंदिराच्या चौथ्या स्तराचे काम सुरू असून, नूतन वर्षापर्यंत सोळा स्तरांचे कामकाज पूर्ण केले जाईल, असा दावा पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विराग सोनटक्के यांनी केला आहे.
नाशिकमधील अनेक पुरातन मंदिरांनी वैशिष्ट्यपूर्ण बांधणीमुळे वेगळेपण जपले आहे. श्री सुंदरनारायण मंदिर हे त्यापैकीच एक असून, नाशिकच्या या ऐतिहासिक ठेव्याचे जतन होण्यासाठी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या कामास तीन वर्षांपूर्वीच प्रारंभ झाला आहे. त्यातील पहिल्या टप्प्यासाठी ४.५, तर उर्वरित दोन टप्प्यांसाठी प्रत्येकी चार याप्रमाणे केंद्र सरकारकडून १२.५ कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील कामकाज सध्या सुरू आहे. या पहिल्या टप्प्यात अधिक झीज झालेले आणि निखळू पाहणाऱ्या मंदिराच्या पश्चिम आणि उत्तरेकडील भागाचे काम हाती घेण्यात आले आहे.
पुरातन वास्तू असलेल्या येथील सुंदरनारायण मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पुरातत्व विभागाच्या सहकार्याने सुरू आहे. शास्त्रीय पद्धतीने काम सुरू असल्याने तसेच काम जसे वरच्या भागात केले जाते, तशी आसपासची जागा कमी उपलब्ध होत असल्याने कामाला अधिक प्रमाणात वेळ लागत असल्याचे पुरातत्व विभागाने स्पष्ट केले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे पाच महिने बंद असलेल्या या कामाला गत आठवड्यात पुन्हा प्रारंभ करण्यात आला आहे. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता होऊन २०१७ साली सुरु वात झाली. या कामासाठी पुरातत्व विभागास प्रारंभी दोन वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. त्यातील निम्म्याहून अधिक कालावधी विद्युत मंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अपेक्षित कामांची पूर्तता होण्यातच व्यतित झाला. तसेच गतवर्षातील पावसाळा आणि यंदाचा पावसाळा असा सुमारे दीड वर्षांहून अधिक कालावधी वाया गेल्यानंतर पहिल्या टप्प्याचे कामकाज सुरू झाले.
दोन टप्पे बाकी
मंदिराच्या पश्चिमेकडील मंडपाचे कामदेखील मंदिराच्या दुसºया टप्प्याच्या कामात निर्धारित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे, तर त्या कामाच्या पूर्ततेनंतर मुख्य मंडप आणि आवार या तिसºया टप्प्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे.
मंदिराच्या पहिल्या टप्प्याचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर २०२० मध्येच पुढील टप्प्याच्या कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यामुळे आणखीन काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पावणेतीनशे वर्ष जुने मंदिर
संपूर्ण काळ्या पाषाणात दगड, चुना, शिसव, नवसागरचा वापर करून हे मंदिर १७५६ साली बांधण्यात आले आहे. कालौघात पर्यावरणातील काही बदलामुळे काही मंदिरांची झीज खूप वेगाने सुरू झाली होती. झीज आणि अन्य कारणाने धोकादायक स्थितीत पोहोचल्याने पुरातत्व विभागाच्या वतीने मंदिराच्या जीर्णोद्धार कामाला
प्रारंभ करण्यात आला
आहे.
नागरशैलीतील मंदिर
गर्भगृह, अंतराळ, सभामंडप अशी रचना असलेले हे मंदिर नागरशैलीतील आहे. या मूळ मंदिरात हिंदू स्थापत्य कला आणि मुस्लीम स्थापत्य कलेचा संमिश्र प्रकार पहायला मिळतो. यादवांच्या काळात किंवा हेमाडपंती शैलीमुळे मंदिराच्या बांधकामात केवळ पाषाणाचाच वापर होत असल्याने पेशवे काळात सिमेंट, चुना आणि वीट या वस्तुंचा वापर झाल्याचे आढळते. गर्भगृहाच्या मागील भागाने पायापासून तर शिरापर्यंत बघितल्यास खालून वर निमुळते होत जाणारे आहे. गर्भगृहावर चार मुक्त दिशांना शिखराच्या प्रतिकृती आहेत. त्यावर कलश असून सभामंडपाचे छत संवर्णा पद्धतीचे आहे.
कुशल कारागिरांची भासते वानवा
सुंदरनारायण मंदिराची बांधणी पाषाणात आहे. महाराष्ट्रात अशी पाषणातील मंदिरांची संख्या कमी आहे. दक्षिणेकडे अशीच मंदिरे असल्याने या मंदिराच्या बांधकामासाठी कारागीर दक्षिणेतून आले आहेत. त्यांना या मंदिर बांधकामाचा सराव असल्याने कौशल्यपूर्ण पद्धतीने केलेल्या कामाला योग्य जागी बसवत पुन्हा नवीन दगडाच्या जुळणीचे काम सुरू आहे. मात्र, या पद्धतीच्या कामाचा अनुभव असलेल्या कुशल कारागिरांची वानवा जाणवते.
४पुरातत्व विभागाला अडथळ्यांची शर्यत पार करत काम करावे लागत आहे. सुरु वातीला प्रत्यक्ष कामास सुरु वात झाली, तेव्हा या ठिकाणी विद्युत वितरणच्या रोहित्रामुळे काम रखडले. नंतरच्या काळात मंदिर बांधण्यासाठी वापरण्यात येणाºया दगडावरून काही वाद झाले. सर्व विभागांशी निगडीत वाद संपुष्टात आल्यानंतर कामकाजाला प्रारंभ करण्यात आला.