बाबाज थिएटरतर्फे रविवार ह्रदयनाथ मंगेशकर यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:10 PM2017-11-17T12:10:16+5:302017-11-17T12:10:28+5:30
नाशिक- नामवंत संगीतकार तथा भावगंधर्व म्हणून ओळखले जाणारे पं. ह्दयनाथ मंगेशकर व सांस्कृतिक, सामाजिक चळवळीत योगदान देणारे सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे या दोघांचा बाबज थिएटर व ग्लोबल व्हीजन इंटरनॅशनल स्कूल यांच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे. दोघांनी वयाची ८० वर्षे पुर्ण केली आहेत. त्याचे औचित्य साधून रविवारी (दि.१९) सायंकाळी साडेसहाला कुसुमाग्रज स्मारकात हा कार्यक्रम होईल.
पद्मश्री पं. ह्रदयनाथ मंगेशकर मराठी माणसाच्या ह्रदयापर्यंत पोहोचले ते त्यांच्या अतिशय सुंदर भावपूर्ण गाण्यांमुळे. चित्रपट संगीत असो, भावसंगीत असो, गझल असो किंवा शास्त्रीय बंदिशी असो,संगीताच्या या प्रत्येक प्रकाराला अत्युच पातळीवर घेऊन जाऊन संगीताची उंची वाढविण्याचे अवघड काम त्यांनी सोप्या पद्धतीने केले. गीतकार, गायक, नट, दिग्दर्शक अशा भूमिका करणाºया सर्वच व्यक्तीमत्वांना त्यांच्या संगीताने पुढे आणलेले आहे. संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांनी नाविन्यपुर्ण प्रयोग केले आहेत. संत ज्ञानेश्वरांच्या रचना त्यांच्या संगीतामुळेच जनसामान्यांपर्यंत पोहोचल्या. याच कार्यक्रमात सांस्कृतिक व सामाजिक चळवळीतील मार्गदर्शक मधुकर झेंडे यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. शहराचा बदलता इतिहास झेंडे यांना मुखोद्गत आहे. नाशिकच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. आजही ते अनेक संस्था, युवक, नागरिक यांना मार्गदर्शन करतात, सक्रीय सहभाग देतात.धार्मिक शहराची सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यात झेंडे यांचे दिर्घकालीन योगदान आहे. त्यामुळे या दोघा व्यक्तीमत्वांच्या सत्कार समारंभास मोठ्या संख्येने नाशिककरांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.