नाशिककरांचा वर्षा पर्यटनाचा रविवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 01:42 AM2020-08-31T01:42:38+5:302020-08-31T01:43:00+5:30
कोरोनाचे संक्रमण अन् मागील चार महिने कडकडीत असलेले लॉकडाऊन यामुळे जेरीस आलेल्या नाशिककरांनी रविवारची सुटी पावसाळी पर्यटनासाठी सार्थकी लावल्याचे चित्र शहराच्या वेशीलगत बघावयास मिळाले. सोमेश्वर मंदिराजवळ असलेल्या गंगापूर शिवारातील दुधस्थळी धबधब्याच्या परिसरात पर्यटकांची झुंबड उडाली होती.
नाशिक : कोरोनाचे संक्रमण अन् मागील चार महिने कडकडीत असलेले लॉकडाऊन यामुळे जेरीस आलेल्या नाशिककरांनी रविवारची सुटी पावसाळी पर्यटनासाठी सार्थकी लावल्याचे चित्र शहराच्या वेशीलगत बघावयास मिळाले. सोमेश्वर मंदिराजवळ असलेल्या गंगापूर शिवारातील दुधस्थळी धबधब्याच्या परिसरात पर्यटकांची झुंबड उडाली होती.
नाशिककर पावसाळी पर्यटनासाठी आज घराबाहेर पडल्याचे दिसून आले. आऊटिंगला जात विरंगुळा म्हणून नागरिकांनी गंगापूर धरण परिसर, काश्यपी धरण, वाघेरा घाट, त्र्यंबकेश्वर, पहिने, पेगलवाडी, वैतरणा, इगतपुरी, भावली इतकेच काय तर खंडोबा टेकडीच्या परिसरातही पर्यटकांनी हजेरी लावली.
सहकुटुंब सेल्फी
कोरोनामुळे पावसाळी पर्यटनावर सध्या बंदी असली तरी नाशिककर घरांमध्ये बसून कमालीचे कंटाळलेले झाल्याने विरंगुळा म्हणून सोमेश्वरजवळील दुधस्थळी धबधबा गाठण्याचा मोह आवरू शकले नाहीत. पावसात ओलेचिंब होत भाजलेले मक्याचे कणीस खात धबधब्याच्या परिसरात तसेच गोदावरी काठालगत सहकुटुंब सेल्फीसेशन करत नाशिककरांनी संडे चांगलाच एन्जॉय केला.