रविवारची पर्वणी : नाशिककरांनी केली धमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2016 10:47 PM2016-07-10T22:47:43+5:302016-07-10T22:49:30+5:30
रविवारची पर्वणी : नाशिककरांनी केली धमाल
नाशिक : अनेक दिवसांनंतर आलेला गोदावरीचा पूर पाहून सैराट झालेल्या नाशिककरांची गोदाकाठावर सेल्फी काढण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाली होती. जलमय झालेला गोदाघाट अन् रविवारच्या सुटीमुळे मिळालेली मोकळीक असा दुहेरी योग जुळून आल्याने आबालवृद्धांनी धमाल केली.
शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर रविवारी सकाळी वाढला आणि नाशिककर एकूणच परिस्थितीचा अंदाज घेऊ लागले. दुपारनंतर गोदाघाटाची पाणीपातळी वाढल्याच्या बातम्या येऊ लागल्या. सोशल मीडियावर पुराची छायाचित्रे शेअर होऊ लागली. त्याबरोबर रविवारच्या सुटीमुळे घरीच असलेल्या नाशिककरांनी पावसाचा जोर कमी होताच गोदाघाटाकडे धाव घेतली. छत्र्या घेऊन, रेनकोट परिधान करून नाशिककरांनी गोदाघाटावरील पुलांवर पोहोचून या मोसमातील पहिला पूर डोळ्यांत साठवून घेतला. रविवार कारंजा येथील होळकर पूल, गाडगे महाराज पूल, घारपुरे घाट तर नागरिकांनी अक्षरश: फुलून गेला होता. पूर पाहण्यासाठी लोक सहकुटुंब गर्दी करीत होते. यावेळी पुराच्या पार्श्वभूमीवर सेल्फी घेण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असल्याचे चित्र होते; मात्र नागरिकांनी दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन येऊन ती रस्त्यातच लावल्याने परिसरात वाहतूक कोंडी होत होती. ती सोडवण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागत होती.