राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी सुनील लिमये; नितीन काकोडकर सेवानिवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 09:26 PM2021-07-01T21:26:10+5:302021-07-01T21:27:26+5:30
काकोडकर यांनी ताडोबा, मेळघाट, ठाणे आदि ठिकाणी वन्यजीव विभागात भरीव कामगिरी केली आहे. उत्तम जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू होती. त्यांच्या कार्यकाळात प्रथमच गेल्या फेब्रुवारी महिन्यात शहापूर येथे वनरक्षक प्रशिक्षण संस्थेत राज्यस्तरीय वनरक्षक, वनपाल यांच्याकरिता कार्यशाळा पार पडली होती.
नाशिक : राज्याच्या पश्चिम वन विभगाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांची पदोन्नतीने राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी (पीसीसीएफ-वाइल्डलाइफ) बदली करण्यात आली आहे. त्यांचा रिक्तपदाचा पदभार मुंबईचे कांदळवन कक्षाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तीवारी यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात आला आहे.
नागपुर कार्यालयातील राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर हे प्रदीर्घ सेवेनंतर भारतीय वनसेवेतून सेवानिवृत्त झाले. १९८६सालच्या बॅचचे भारतीय वनसेवेतील काकोडकर हे अधिकारी आहेत. डिसेंबर २०१८सालापासून ते पीसीसीएफ या पदावर कार्यरत होते. त्यांनी वन्यजीव व्यवस्थापन प्रशिक्षणामध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे. काकोडकर यांनी ताडोबा, मेळघाट, ठाणे आदि ठिकाणी वन्यजीव विभागात भरीव कामगिरी केली आहे. उत्तम जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू होती. त्यांच्या कार्यकाळात प्रथमच गेल्या फेब्रुवारी महिन्यात शहापूर येथे वनरक्षक प्रशिक्षण संस्थेत राज्यस्तरीय वनरक्षक, वनपाल यांच्याकरिता कार्यशाळा पार पडली होती. वन्यजीव व्यवस्थापनासह फ्रन्टलाइनवरील कर्मचारी, अधिकारी वर्गाची क्षमता उंचविण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला. मानव-वन्यजीव संघर्ष थोपविण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम चालविले.
-
लिमये १९८८च्या बॅचचे आयएफएस अधिकारी
सुनील लिमये हेदेखील १९८८सालच्या बॅचचे आयएफएस अधिकारी आहेत. त्यांनी ३० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत पुणे, कोल्हापुर, सातारा, रायगड, अमरावती, नागपुर, बोरिवली येथील संजय गांधी राष्टीय उद्यान येथे विविध उच्च पदांवर जबाबदारी पार पाडली आहे. लिमये यांची राज्य शासनाने राज्याच्या वन्यजीव विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी पदोन्नती दिली आहे.