सभापतिपदी सुनीता देवरे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 09:52 PM2020-06-16T21:52:57+5:302020-06-17T00:30:17+5:30
सटाणा : येथील बाजार समितीच्या सभापतिपदी आमदार दिलीप बोरसे यांच्या निकटवर्तीय वीरगाव गणाच्या संचालक सुनीता ज्ञानेश्वर देवरे यांची मंगळवारी (दि. १६) बिनविरोध निवड करण्यात आली.
सटाणा : येथील बाजार समितीच्या सभापतिपदी आमदार दिलीप बोरसे यांच्या निकटवर्तीय वीरगाव गणाच्या संचालक सुनीता ज्ञानेश्वर देवरे यांची मंगळवारी (दि. १६) बिनविरोध निवड करण्यात आली.
डांगसौंदाणे गणाचे संचालक संजय सोनवणे यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी आज मंगळवारी येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक महेश भडांगे यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची विशेष सभा घेण्यात आली.
रिक्त पदासाठी वीरगाव गणाच्या संचालक सुनीता ज्ञानेश्वर देवरे यांनी निर्धारित वेळेत नामनिर्देशन पत्र दाखल केले. त्यांना अनुक्रमे श्रीधर कोठावदे, संजय देवरे हे सूचक व अनुमोदक होते. सौ. देवरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी सौ. देवरे यांची बिनविरोध निवड झाल्याने मावळते सभापती संजय सोनवणे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले, तर प्रशासनातर्फे सचिव भास्करराव तांबे, ब्राह्मणगाव गटाच्या वतीने प्रशांत बच्छाव यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
मावळते सभापती सोनवणे, संचालक संजय देवरे, नरेंद्र अहिरे यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उपसभापती प्रभाकर रौंदळ, ज्येष्ठ संचालक श्रीधर कोठावदे, मधुकर देवरे, तुकाराम देशमुख, पंकज ठाकरे, प्रकाश देवरे, सरदारिसंग जाधव, जयप्रकाश सोनवणे, संजय बिरारी, संदीप साळी, केशव मांडवडे, रत्नमाला सूर्यवंशी, वेणूबाई सोनवणे यांच्यासह वीरगावचे सरपंच ज्ञानेश्वर देवरे, विनोद अहिरे, किरण अहिरे, मुन्ना सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
आमदार दिलीप बोरसे, प्रशांत बच्छाव, संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षांपासून बिनविरोध निवडीचा पायंडा पाडला आहे. यंदाही हा पायंडा कायम असून, आज सकाळी शहरापासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र दोधेश्वर मंदिरात सभापतिपदासाठी इच्छुक असलेले संजय देवरे, पंकज ठाकरे, नरेंद्र अहिरे, सुनीता देवरे या चौघांच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. याच्यात सौ. देवरे यांचे नशीब उजळले. गेल्या वर्षी चांदवड येथील रेणुका मंदिरात संजय सोनवणे यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांना रेणुकामाता प्रसन्न झाली तर आता देवरे यांना भगवान शिवजी प्रसन्न झाल्याची चर्चा होती.