शनिवारपासून ‘सुन्नी इज्तेमा’ : पैगंबरांच्या शिकवणीसह धार्मिक साहित्यावर होणार विचारमंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 04:40 PM2020-01-23T16:40:46+5:302020-01-23T16:56:53+5:30
मनपाच्या पश्चिम विभागाकडून सुविधा पुुरविण्यास असमर्थता दर्शविली गेली आणि चक्क एका खासगी ठेकेदाराशी संपर्क करण्याची सुचना त्या पत्राला उत्तरात करण्यात आली.
नाशिक :इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांनी समाजाला दिलेली मानवतेच्या शिकवणीचा प्रसार-प्रचार व्हावा तसेच धार्मिक साहित्य आणि सुफी संतांच्या विचारांचे आदानप्रदान होऊन वैचारिक मंथन घडावे, या उद्देशाने सालाबादप्रमाणे यंदाही सुन्नी दावत-ए-इस्लामी या धार्मिक संघटनेच्या नाशिक शाखेच्या वतीने दोनदिवसीय विभागीय स्तरावरील मेळावा (सुन्नी इज्तेमा) आयोजित केला आहे. शनिवारपासून मेळाव्याला प्रारंभ होणार असून पहिला दिवस महिलांसाठी राखीव असेल अशी माहिती संयोजकांनी दिली.
सुन्नी दावते इस्लामी ही राष्ट्रीय मुस्लीम धार्मिक संघटना असून वर्षभर विविध जिल्ह्यांत या संघटनेच्या वतीने धार्मिक मेळावे आयोजित केले जातात. याअंतर्गत नाशिक विभागासाठी शनिवारपासून दोनदिवसीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्र्यंबकरोडवरील शहाजहॉँनी इदगाह मैदानावर हा मेळावा पार पडणार आहे. मेळाव्याचे हे सोळावे वर्ष आहे. मेळाव्याच्या ठिकाणाला ‘वादी-ए-सादीक’ असे नाव देण्यात आले आहे. मेळ्याव्यासाठी इस्लामधर्मीय सुन्नी पंथाचे ज्येष्ठ धर्मगुरू हजेरी लावणार आहे. यामध्ये मुफ्फकिर-ए-इस्लाम हजरत मौलाना कमरूज्जमा खान आजमी, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मौलाना शाकीर अली नुरी, हाश्मीया विद्यालयाचे प्राचार्य मौलाना कारी रिजवान खान, हजरत मौलाना सय्यद अमिनुल कादरी यांच्यासह स्थानिक धर्मगुरू तसेच शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी हेदेखील उपस्थित राहणार आहेत. रविवार (दि.२६) पुरूषांसाठी राखीव असून रात्री दहा वाजता सामुहिक दुवापठणाने मेळाव्याचा समारोप करण्यात येणार आहे.
मनपाने दिला खासगी ठेकेदाचा ‘संपर्क’
मागील सोळा वर्षांपासून मनपा प्रशासनाकडून मेळाव्याच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, मैदानाचे सपाटीकरणासारखी सुविधा पुरविल्या जात होत्या. यंदाही या सुविधांची मागणी करणारे पत्र संघटनेकडून मनपाला देण्यात आले होते; मात्र मनपाच्या पश्चिम विभागाकडून सुविधा पुुरविण्यास असमर्थता दर्शविली गेली आणि चक्क एका खासगी ठेकेदाराशी संपर्क करण्याची सुचना त्या पत्राला उत्तरात करण्यात आली. यामुळे संयोजकदेखील चक्रावले. खासगी ठेकेदारांच्या ‘मार्केटिंग’ची जबाबदारी मनपा प्रशासनाकडून घेतली गेली की काय? असा प्रश्न उपस्थित करणण्यात आला आहे.