मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या सुपरफास्ट मंगला एक्सप्रेसनं बिबट्याला चिरडले

By अझहर शेख | Published: August 1, 2023 03:50 PM2023-08-01T15:50:54+5:302023-08-01T15:51:22+5:30

नाशिकमधील स्थानकाजवळ दुर्घटना, ही बाब स्टेशन मास्तरच्या दिवस उजाडल्यानंतर लक्षात येताच त्यांनी नाशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाला माहिती कळविली.

Superfast Mangala Express running towards Mumbai crushed the leopard | मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या सुपरफास्ट मंगला एक्सप्रेसनं बिबट्याला चिरडले

मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या सुपरफास्ट मंगला एक्सप्रेसनं बिबट्याला चिरडले

googlenewsNext

नाशिक : दारणानदीकाठालगत बिबट्यांची संख्या जास्त असून या भागातील मळे परिसरात बिबट्यांचा वावर आढळून येतो. देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकाजवळ बिबट्याला सुपरफास्ट मंगला लक्षद्वीप एक्सप्रेसने चिरडले. मंगळवारी (दि.१) पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यामध्ये अंदाजे अडीच वर्षे वयाची बिबट्याची मादी जागीच ठार झाली. सुदैवाने या घटनेत मादीसोबत असलेला नर बिबट्या बचावला. 

नाशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून मिळालेली माहिती अशी, नाशिकरोड रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने धावणारी सुपरफास्ट मंगला एक्सप्रेसची पहाटे देवळाली कॅम्प येथे रेल्वे स्थानकाजवळच्या पोल क्र.१८१/३० येथे बिबट्याला धडक बसली. यावेळी बिबट्या रेल्वे रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात होता. ही बाब स्टेशन मास्तरच्या दिवस उजाडल्यानंतर लक्षात येताच त्यांनी नाशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाला माहिती कळविली. वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे यांनी तत्काळ वनपरिमंडळ अधिकारी उत्तम पाटील यांचे पथक घटनास्थळी रवाना केले. त्यांनी घटनास्थळी जावून बिबट्याच्या मृतदेहाचा पंचनामा केला. यावेळी बिबट्याच्या चारही पंजांचे नखे, मिशी, दात आदि अवयव शाबूत असल्याची खात्री पटविली. वन्यजीव रेस्क्यू वाहनचालक सुनील खानझोडे यांनी मृतदेह वाहनातून शवविच्छेदनासाठी शहरातील अशोकस्तंभ येथील पशुंच्या दवाखान्यात आणला. याठिकाणी पशुवैद्यकांनी शवविच्छेदन केले. यानंतर बिबट्याच्या मतृदेहावर वनविभागाच्या गोवर्धन येथील रोपवाटिकेत दहन संस्कार करण्यात आले, अशी माहिती गाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या सहा महिन्यात रेल्वेच्या धडकेत बिबट्या ठार होण्याची ही पहिलीच घटना नाशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या हद्दीत घडली.

Web Title: Superfast Mangala Express running towards Mumbai crushed the leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.