मद्यधुंद सुरक्षारक्षकांकडून सुपरवायझरला मारहाण
By admin | Published: October 21, 2016 02:29 AM2016-10-21T02:29:17+5:302016-10-21T02:32:09+5:30
मद्यधुंद सुरक्षारक्षकांकडून सुपरवायझरला मारहाण
नाशिक : वेतनवाढीच्या कारणावरून कुरापत काढून मद्यधुंद सुरक्षारक्षकांनी सुपरवायझरला बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि़१८) रात्रीच्या सुमारास तिडके कॉलनीतील सोपान हॉस्पिटलसमोर घडली़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वर्धा येथील युनिव्हर्सल कमर्शियल सव्हिर्सेस या सिक्युरिटी एजन्सीचे एरिया सुपरवायझर सचिन आगलावे हे रात्री ९ वाजेच्या सुमारास भावासोबत तिडके कॉलनीतील सोपान हॉस्पिटलसमोर नेमणुकीस असलेल्या सुरक्षारक्षकांच्या तपासणीसाठी गेले होते़ त्यांना या ठिकाणी असलेले सुरक्षारक्षक संशयित अतुल प्रभाकर वाघ (रा. कस्तुरबानगर, होलाराम कॉलनी) याने मद्यप्राशन केलेले आढळले़ याबाबत वाघला जाब विचारला असता वाघ व शेजारीच नेमणुकीस असलेल्या प्रशांत सूर्यवंशी यांनी पगारवाढीची मागणी करून वाद सुरू केला़ यावेळी आगलावे यांचे बंधू सुनील यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता वाघ याने जवळ पडलेला लोखंडी रॉड उचलून सुपरवायझर आगलावे यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले़ यानंतर या दोघांनी विटा व दगडांनी मारहाण केली़ (प्रतिनिधी)