अधीक्षकाकडून रेशनची काळ्याबाजारात विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 10:22 PM2020-05-08T22:22:56+5:302020-05-09T00:04:22+5:30
सटाणा : लॉकडाउनमुळे हाताला काम नसल्यामुळे अनेक आदिवासी बांधवांवर उपासमारी वेळ आली असताना बागलाणमधील मानूर येथील आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी असलेला शिधा काळ्याबाजारात विक्रीसाठी जात असताना ग्रामस्थांनी अधीक्षकासह रंगेहाथ पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सटाणा : लॉकडाउनमुळे हाताला काम नसल्यामुळे अनेक आदिवासी बांधवांवर उपासमारी वेळ आली असताना बागलाणमधील मानूर येथील आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी असलेला शिधा काळ्याबाजारात विक्रीसाठी जात असताना ग्रामस्थांनी अधीक्षकासह रंगेहाथ पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सदर प्रकार गुरु वारी (दि. ७) रात्री साडेअकराच्या सुमारास उघडकीस आला. दरम्यान तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी तत्काळ मानूर आश्रमशाळेला भेट देऊन ग्रामस्थांनी पकडलेल्या धान्य व खाद्यतेलाचा पंचनामा केला असून, याबाबतचा अहवाल मुख्याध्यापकांना कळवणचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी पंकज आशिया तसेच तहसील कार्यालय बागलाण यांना सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बागलाणच्या पश्चिम भागातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा निकृष्ट दर्जाचे जेवण, शासनाने ठरवून दिलेल्या आहारानुसार न दिले जाणारे भोजन या ना त्या कारणाने नेहमीच वादग्रस्त ठरत असताना गुरुवारी रात्रीच्या सुमारास मानूर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या अन्नधान्याच्या साठ्याची अनेक दिवसांपासून काळ्याबाजारात विल्हेवाट लावली जात असल्याची कुणकुण ग्रामस्थांना लागली होती. रात्री साडेअकराच्या सुमारास ग्रामस्थ शाळेजवळ दबा धरून बसले असता शाळेचे अधीक्षक सांगेवार हे स्वत: गहू, तांदूळ, डाळ, जिरे, मोहरी, मठ, हरभरा आणि तेलाचा डबा घेऊन त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी गावाबाहेर जात असताना रंगेहाथ पकडले गेले.
संतप्त नागरिकांनी गराडा घालून अन्य ठिकाणी साठवलेला अन्नधान्यसाठा कुठे आहे अशी मागणी केली. हा प्रकार पाहून अधीक्षकाने तेथून पळ काढला. ग्रामस्थांनी मध्यरात्रीच्या सुमारास तहसीलदार इंगळे पाटील यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. यावेळी इंगळे पाटील यांनी पंचायत समिती सदस्य पंडित अहिरे, पंढरीनाथ गांगुर्डे, उत्तम बहिरम, आत्माराम बहिरम, रंगनाथ गांगुर्डे, नीलेश गांगुर्डे यांना साठा जप्त करण्याच्या सूचना दिल्या. शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास तहसीलदार इंगळे पाटील, एस.जी. भामरे यांनी आश्रमशाळेला भेट देऊन अधीक्षकाने चोरलेल्या अन्नधान्याच्या गोठींचा पंचनामा करण्यात आला. यावेळी भांडार गृहामधील सर्व साठ्याची तपासणी करण्यात आली.
-----
दुधाच्या साठ्यात तफावत
शासनामार्फत विद्यार्थ्यांना दूधपुरवठादेखील सुरु आहे. तहसीलदार यांच्यासमोर शालेय व्यवस्थापनला मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीत तफावत आढळून आली व दुुधाच्या पिशव्यांचा साठा विचारला असता त्यांनी दोन हजार पिशव्या शिल्लक असल्याची माहिती दिली, मात्र प्रत्यक्षात २८०० पिशव्या आढळून आल्याने यंत्रणा अधिकच संशयाच्या भोवऱ्यात सापडली.