अंधश्रद्धा मानवी विकासातील अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:17 AM2021-03-01T04:17:04+5:302021-03-01T04:17:04+5:30
नाशिक : अंधश्रद्धा मानवी विकासातील अडथळा असून, समाजातील प्रत्येक घटकाने वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन ...
नाशिक : अंधश्रद्धा मानवी विकासातील अडथळा असून, समाजातील प्रत्येक घटकाने वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केले.
मविप्रच्या समाजकार्य महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘सामाजिक आव्हाने आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका’ या विषयावरील वेबिनारमध्ये अविनाश पाटील यांनी विद्यार्थ्यांसह शासकीय व अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक, अंधश्रद्धेचे पैलू, अंधश्रद्धेचे प्रकार, अंधश्रद्धेचे वर्गीकरण, अंधश्रद्धेचा विविध समुदाय यांवरील प्रभाव सांगत असताना राष्ट्र विकासावर टप्प्याटप्प्याने होणारे परिणाम उदाहरणासह त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांसमोर मांडले. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी विविध कार्यकर्त्यांचे बलिदान व कार्य महाराष्ट्रातील समाजकारणात ठळकपणे नोंद घेण्यासारखे आहे. बहुआयामी कामाने जनमानसात ठसा उमटवलेल्या कार्यकर्त्यांचे कार्य धोरणात्मक नसून कृती कार्यक्रम करणारे, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या प्रचार-प्रसार, जनजागृती करणारे असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी समाज कार्यकर्त्यांच्या अंगी विविध ज्ञान, कौशल्य व गुण असणे गरजेचे आहे हे सांगून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कार्य हे व्यक्तीच्या, समुदायाच्या, समाजाच्या मानसिकतेच्या वर्तनावर मार्गदर्शन करणारे असावे, असा सल्लाही दिला.
कार्यशाळेसाठी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देशमुख, कार्यक्रम समन्वयक प्रा. सुनीता जगताप , प्रा. डॉ. मनीषा शुक्ल व महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.