१८०० क्षमतेच्या केंद्रांना १२४२ लसींचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:25 PM2021-05-11T16:25:29+5:302021-05-11T16:26:05+5:30
नांदगाव : १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाचे वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे लसीकरण केंद्रांवर होणारी संभाव्य गर्दी तसेच, कोरोनाच्या भीती ...
नांदगाव : १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाचे वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे लसीकरण केंद्रांवर होणारी संभाव्य गर्दी तसेच, कोरोनाच्या भीती पसरवणाऱ्या वार्ता यामुळे घबराट निर्माण होऊन, लसीकरणाचा किमान पहिला डोस मिळावा यासाठी अधिर झालेला वर्ग, यामुळे लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी हा शासनाच्या चिंतेचा विषय झाला आहे. कोरोनाची साखळी तोडण्याच्या प्रयत्नांना लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी अडथळा तर ठरणार नाही ना, अशी रास्त शंका नागरिकांच्या मनात घर करून असल्याने केंद्रांवरच्या लसीकरणात सुसूत्रता आणण्याला अग्रक्रम द्यावा, अशी मागणी जनतेतून पुढे आली आहे.
मागणीपेक्षा पुरवठा खूपच कमी असल्याने, लसीच्या दुसऱ्या डोसची वाट बघणाऱ्याचे जीव टांगणीला पडले असून, लसीकरण केंद्रांवर डोस मिळविण्याच्या अहमहमिकेत पहिला डोस मिळवणारे बाजी मारत असल्याचे चित्र निर्माण झाल्याने, दुसरा डोस निर्धारित वेळेपेक्षा लांबत चालला आहे. याची नागरिकांत चिंता निर्माण झाली आहे. याउलट आता काहीही करून पहिला डोस मिळालाच पाहिजे. म्हणजे आपण काही प्रमाणात का होईना सुरक्षित होऊ, अशी भावना बळावली आहे. पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या दुसऱ्या डोससाठी इच्छुक असलेल्या लोकांच्या संख्येपेक्षा खूपच जास्त असल्याने लसीकरण केंद्रावर रांगा लांबत चालल्या आहेत.
लसीकरण केंद्रांवर नागरिकांची उडीवर उडी पडत असून मर्यादित लस उपलब्ध होत असल्याने गोंधळात अधिक भर पडली आहे. तालुक्यात गाजावाजा करून सुरू केलेल्या दहा लसीकरण केंद्रात दरदिवशी १८०० जणांचे लसीकरण करण्याची क्षमता असताना प्रत्यक्षात जेमतेम सात लसीकरण केंद्रांना पुरेल, असा पुरवठा केला जात आहे.
नांदगाव तालुक्यात दहा लसीकरण केंद्रे असून, त्यांची एकत्रित क्षमता दररोज १८०० व्यक्तींना लसीकरण करण्याची आहे. तालुक्यातले पहिले लसीकरण केंद्र २७ जानेवारीला मनमाड येथे सुरू झाले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पाच प्राथमिक आरोग्य केंद्र व मनमाडचे एक व नांदगावचे दोन असे दहा केंद्र आहेत. लसीकरणाच्या १९३ सत्रात, पहिला डोस १७९७५, दुसरा डोस ४१३९ असे एकूण २२११४ डोस देण्यात आले. पैकी २०६७५ कोविशिल्ड व १४३९ कोव्हॅक्सिनचे दिले आहेत. न्यायडोंगरी येथे २४६० डोस देण्यात आले. ही आकडेवारी दि. १० मे २०२१ पर्यंतची आहे.