थकीत पाणीपट्टी न भरल्यास पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:11 AM2021-06-18T04:11:31+5:302021-06-18T04:11:31+5:30
सिन्नर : पाण्याचा वापर करायचा मात्र त्याची पाणीपट्टी भरायची नाही, ही मानसिकता नागरिकांमध्ये बळावत चालली असून, ती बदलणे आवश्यक ...
सिन्नर : पाण्याचा वापर करायचा मात्र त्याची पाणीपट्टी भरायची नाही, ही मानसिकता नागरिकांमध्ये बळावत चालली असून, ती बदलणे आवश्यक आहे. सोळागाव पाणीपुरवठा योजनेत यापुढे जी गावे थकीत पाणीपट्टी भरणार नाहीत त्यांचा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी दिला.
मनेगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेचे तब्बल ३६ लाखांचे वीजबिल थकले असून, त्यामुळे योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. योजनेतील सर्व गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने मुरकुटे यांनी सोळा गावांचे सरपंच आणि ग्रामसेवकांची तातडीची बैठक घेतली. योजनेचे एकूण ३६ लाखांचे वीजबिल थकीत असून वीज वितरणच्या अधिकाऱ्यांशी बोलणे झाल्यानंतर त्यांना सहा टप्प्यांत वीजबिल भरण्याची मुभा दिली असल्याचे मुरकुटे यांनी या वेळी सांगितले. त्यामुळे थकीत पाणीपट्टीच्या प्रमाणात ग्रामपंचायतींना रकमा ठरवून देत दोन दिवसांत त्यांचा भरणा करून पहिल्या टप्प्यात सहा लाखांचे वीजबिल भरून पाणीपुरवठा तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
या वेळी विस्तार अधिकारी पी. एम. बिब्वे, योजनेचे सचिव एम. बी. यादव, ग्रामसेवक परेश जाधव, एम. टी. भणगीर, एम. एम. मोरे, डी. आर. बोरसे, धारणगावचे सरपंच परशराम शिरोळे, कुंदेवाडीचे सरपंच रतन नाठे, खोपडीचे सरपंच गणेश घोलप, मनेगावच्या सरपंच संगीता शिंदे आदींसह ग्रामसेवक, सरपंच उपस्थित होते.
-----------------
आज होणार योजना अध्यक्षांची निवड
गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्षपदाची निवड आज शुक्रवारी (दि. १८) होणार आहे. त्यानंतर समिती गठीत करून ही योजना सुरळीत चालविण्यासाठी समितीने प्रयत्न करावेत आणि गावांची पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करावी, असे आवाहन मुरकुटे यांनी केले.