जिल्ह्यात एक लाखाहून अधिक मेट्रिक टन खत पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 01:41 AM2021-07-31T01:41:08+5:302021-07-31T01:42:09+5:30
जिल्ह्यात १ एप्रिल ते २९ जुलैपर्यंत १ लाख ११ हजार ६९ मेट्रिक टन खतांचा पुरवठा करण्यात आला असून त्यात ५१४०७ मेट्रिक टन युरियाचा समावेश आहे. प्रत्येक तालुक्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध असून कोठेही रासायनिक खतांची टंचाई नसल्याचा दावा कृषी विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.
नाशिक : जिल्ह्यात १ एप्रिल ते २९ जुलैपर्यंत १ लाख ११ हजार ६९ मेट्रिक टन खतांचा पुरवठा करण्यात आला असून त्यात ५१४०७ मेट्रिक टन युरियाचा समावेश आहे. प्रत्येक तालुक्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध असून कोठेही रासायनिक खतांची टंचाई नसल्याचा दावा कृषी विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. निफाड तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक १३६८६ मेट्रिक टन इतका, तर मालेगाव तालुक्यात १३६७० मेट्रिक टन इतका खतांचा पुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पिके बहरली असून, जोमदार वाढीसाठी आता शेतकऱ्यांकडून खतांची मात्रा दिली जात आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात खतांची खरेदी केली जात आहे. काही तालुक्यांमध्ये विक्रेत्यांकडून युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असून, शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होऊ लागल्या आहेत. युरिया मागणाऱ्या शेतकऱ्यांना इतर खतांच्या खरेदीची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी सांगितले. खतांबाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कृषी विभागाने जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, त्यासाठी देण्यात आलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्कसाधून शेतकऱ्यांना विक्रेत्यांची तक्रार करता येणार आहे.
चौकट-
तालुकानिहाय झालेला खतांचा पुरवठा ( एप्रिल ते २९ जुलै)
तालुका युरिया डीएपी एमओपी संयुक्त खते
चांदवड २२१० ५३९ ० २९८४
देवळा २३४९ २२३ ६१ २०८१
दिंडोरी २८१९ ६४१ ४ ३० ४००८
इगतपुरी २७६१ ३५६ ११७ १३३७
कळवण ३१६३ २४७ ९६ २६१८
मालेगाव ६९२६ ४६६ २७५ ६००३
नांदगाव ५४१० ३०० १९८ ४५२७
नाशिक ४४०५ ५२० ३४६ ४८८५
निफाड ५३८९ १००४ ५३४ ६७५९
पेठ ९०१ १४५ ० ६०८
सुरगाणा ३२३५ १३० ० ८२८
सटाणा ४२६० ४४४ २२३ ३८५८
सिन्नर २०७८ ५३२ १५५ ४१०१
त्र्यंबक १०८३ २२० ० ६५५
येवला ४४१८ ६०३ २५२ ५३५३
कोट-
कोणताही खतविक्रेता लिंकिंग करत नाही. पूर्वी अधिकृतपणे ही पद्धत होती पण आता तसे कोणताही विक्रेता करत नाही. याबाबत आता कृषी विभागही सतर्क झाला आहे. दिंडोरी, नाशिक, निफाड या भागांत युरियाची टंचाई जाणवत नाही. येवला, इगतपुरी भागात थोडीफार परिणाम दिसू शकतो. - अरुण मुलाने, उपाध्यक्ष, नाशिक ॲग्रो डीलर्स असोसिएशन