भाभानगर रुग्णालयाच्या समर्थनार्थ सरसावल्या परिसरातील महिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 12:49 AM2017-11-08T00:49:32+5:302017-11-08T00:49:37+5:30
भाभानगर येथील गायकवाड सभागृहालगतच्या जागेत शंभर खाटांचे रुग्णालय उभारण्यास स्थानिक नागरिकांनी विरोधाचा पवित्रा घेतलेला असतानाच, आता जवळच असलेल्या भारतनगर, शिवाजीवाडी, वडाळा, बजरंगवाडी येथील महिला रुग्णालयाच्या समर्थनार्थ पुढे सरसावल्या असून, भाभानगर येथेच रुग्णालय उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.
नाशिक : भाभानगर येथील गायकवाड सभागृहालगतच्या जागेत शंभर खाटांचे रुग्णालय उभारण्यास स्थानिक नागरिकांनी विरोधाचा पवित्रा घेतलेला असतानाच, आता जवळच असलेल्या भारतनगर, शिवाजीवाडी, वडाळा, बजरंगवाडी येथील महिला रुग्णालयाच्या समर्थनार्थ पुढे सरसावल्या असून, भाभानगर येथेच रुग्णालय उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे गिते समर्थकांपाठोपाठ आता फरांदे समर्थकांनीही आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.
शंभर खाटांच्या रुग्णालयाला भाभानगर येथील स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवित न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाभानगर येथेच रुग्णालय झाले पाहिजे, अशी भूमिका भारतनगर, शिवाजीवाडी, वडाळा, बजरंगवाडी या स्लम भागातील महिलांनी घेतली असून, तसे निवेदन अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, भाभानगर येथे प्रस्तावित महिला रुग्णालय अन्यत्र बांधण्याचा घाट काही लोकांकडून घातला जात आहे. परंतु, परिसरात इतर असलेली रुग्णालये ही खूप महागडी असून, गोरगरीब महिला रुग्णालयांना तेथे उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. तरीही खासगी रुग्णालयांचे हितसंबंध जपण्यासाठीच महिला रुग्णालयाला विरोध केला जात असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. सदर रुग्णालय भाभानगर येथेच बांधण्यात यावे व अन्यत्र स्थलांतरित करू नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर शमीना पिंजारी, रेश्मा खान, अलका चौहान, साजेदा सय्यद, रंजना अंबोरे, हलीमा राजेखान यांच्यासह अनेक महिलांच्या स्वाक्षºया आहेत.