मेंढीच्या शिवाश्रमात मिळणार निराधारांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 06:07 PM2019-03-20T18:07:05+5:302019-03-20T18:07:56+5:30
सिन्नर : शिवाश्रम हा विचार असून सत्यामध्ये मोठी ताकद आहे. त्याचा पराभव कधी होत नाही. शिवाश्रम ५३८ लोकांचा परिवार आहे. पैसा जगात सर्वस्व नसून प्रामाणिकपणा देखील महत्वाचा आहे. ज्या आई-वडिलांचा मुले सांभाळ करत नाही, त्यांना या शिवाश्रमात आश्रय मिळणार असल्याचा विश्वास शिवाश्रमाचे संकल्पक डॉ. विजय महाराज तनपुरे यांनी व्यक्त केला.
सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील मेंढी येथे शिवाश्रमाच्या उभारणींसाठी आयोजित बैठक शिर्डी येथील हॉटेल निसर्ग येथे पार पाडली. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सहारा व्यसनमुक्ती केंद्राचे समुपदेशक मधुकर गिते, साई आदर्श मल्टिस्टेट बॅँकेचे अध्यक्ष शिवाजी कपाळे, उद्योजक मुकुंद सिनगर उपस्थित होते. शिवाश्रमासाठी मधुकर गिते यांनी ५० गुंठे जागा दान दिली असून, येत्या २३ मार्चला त्या ठिकाणी शिवाश्रमाची पायाभरणी करून बांधकामास प्रारंभ होणार असल्याचे डॉ. तनपूरे यांनी सांगितले. सर्वाेतोपरी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थितांच्या वतीने मधुकर गिते व त्यांच्या पत्नी शिला गिते यांचा सत्कार करण्यात आला. उद्योजक शिवनाथ कापडी, छावा संघटनेचे विलास दळवी, दत्तात्रय पानसरे, प्रेरणा मंडळाचे अध्यक्ष पी. आर. बेलोटे, मुकुंद सिंगर, मधुकर गिते यांनी मार्गदर्शन केले.