फेट्यांचा रोपांना आधार
By admin | Published: June 5, 2015 12:22 AM2015-06-05T00:22:27+5:302015-06-05T00:22:39+5:30
पर्यावरणप्रेम : वृक्षारोपणासह संरक्षण-संवर्धनाची चालते मोहीम
अझहर शेख ल्ल नाशिक
लग्नसमारंभामधील फेटे गोळा करून त्यांचा वापर ‘आपलं पर्यावरण ग्रुप’च्या युवा सदस्यांकडून मागील काही वर्षांपासून केला जात आहे. कल्पकतेचा वापर करत लग्नातील गोळा केलेले फेटे फाडून त्यामार्फत रोपांना सुरक्षितता प्रदान करण्याचा प्रयत्न युवा पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे.
वादळवाऱ्याने रोपे वृक्षसंरक्षक जाळ्यांवर घासली जातात व तुटूनही पडतात. वृक्षारोपणाच्या उद्देशालाच यामुळे कुठेतरी तडा जातो. म्हणून वृक्षसंवर्धन व संरक्षणासाठी हे युवा पर्यावरणप्रेमी लावलेल्या रोपांना फेट्यांच्या कापडाचा ‘आधार’ देत आहेत.
‘फेटा’ हा लग्नसमारंभातील मान-सन्मानाची बाब समजली जाते. समारंभाचे काही तास हा फेटा डोक्यावर संबंधितांकडून मिरवला जातो. त्यानंतर हा फेटा त्याच ठिकाणी कुठेतरी पडतो किंवा घडी करून वाहनाच्या डिक्कीत ठेवला जातो. आपलं पर्यावरण ग्रुपसोबत जोडलेले काही छायाचित्रकार तसेच मंडप व्यावसायिक व मंगल कार्यालयांचे चालक फेटे गोळा करून ठेवत युवा सदस्यांकडे सुपूर्द करतात.