...समजा, वाघच सिंह झाला तर!

By admin | Published: August 19, 2014 12:21 AM2014-08-19T00:21:09+5:302014-08-19T01:22:59+5:30

...समजा, वाघच सिंह झाला तर!

Suppose, if Waghcha becomes lion! | ...समजा, वाघच सिंह झाला तर!

...समजा, वाघच सिंह झाला तर!

Next

हेमंत कुलकर्णी
तो एक सिंह होता. म्हणजे आहे. पण सिंह असूनही, त्याची अवस्था वाघासमोर (की वाघिणीसमोर?) बांधलेल्या बकरीसारखी होती, असे आता सारेच म्हणू लागले आहेत. नाव सोनुबाई आणि हाथी कथलाचा वाळा, अशीच काहीशी अवस्था म्हणे या सिंहाची. नुस्तं नावातच मनमोहकत्व. पण व्यक्तिमत्वात मात्र, कोणाच्याही मनाला मोह पडावा असं काहीही नाही.
आता हा घ्या वाघ. नुसता नावाचाच (त्याच्या कळपातलेच लोक हे बोलतात बरं) त्याचीही गत तशीच. तोदेखील वाघासमोर बांधलेल्या बकरीसारखाच. नाव यतीन. आता यती म्हणजे स्वत:चे मनोविकार ताब्यात ठेवणारा, संन्यासी. यती-न म्हणजे अर्थातच मग जो यती नाही तो, म्हणजे आपले मनोविकार स्वत:च्या ताब्यात न ठेवणारा. अर्थात ही झाली भाषाशास्त्रीय चिकित्सा. प्रत्यक्षात मनोविकार असणे आणि ते ताब्यात ठेवणे वा न ठेवणे दूरच. या वाघाला मुळात मनच आहे की नाही, हे गेल्या किमान अडीच सालात कुणाला कळलंच नाही.
आता पुन्हा त्या सिंहाकडे वळू. तो सिंह एकदा प्रधान बनला वा बनविला(?) गेला. सिंह असूनही हा गुरगुरत नाही, आयाळीचा धाक दाखवित नाही, सुळे आणि दात कोणाच्याही दृष्टीस पडू नयेत याची दक्षता घेतो, ही बाब लक्षात आल्यानंतर, सारे म्हणू लागले, बरा दिसतोय हा. त्यालाच पुन्हा प्रधान बनवू. म्हणजे त्याला मखरात बसवून आपण आपले उद्योग करायला मोकळे.
आता या वाघाची पाळी. त्याचेही प्रधानपद संपायला आले आहे. त्याची जागा कोणत्या प्रजातीकडे जायची, याचा फैसला झाला आहे. योगायोग आणि वाघोबाचं नशीब पाहा कसं बलवत्तर! हा वाघ ज्या प्रजातीचा, त्याच प्रजातीला म्होरलं प्रधानपद आता दिलं जायचंय. ही प्रजाती तशी संख्याबळाच्या दृष्टीनं घनघोर. तेव्हां अनेकांच्या मुठी जागच्या जागीच वळू लागल्या आहेत. अनेकांनी आपापल्या सुळ्यांना आणि नखांना धार लावायला काढली आहे. त्यातनंच कुणीतरी या यती नसलेल्या वाघाची जागा घेणार हे जवळजवळ नक्की! पण ते समजा टाळलं तर?
त्या सिंहाला नाही, परत परत सिंहासनाधीष्ट केलं गेलं. तसंच या वाघालाही केलं तर? उगाच तंटाबखेडा नको. जंगलात अनेकांच्या डरकाळ्या नको. उद्योग्यांना कुणाची आडकाठी नको. सारा संसार कसा सुखेनैव चालू राहील, जसा तो आज सुरु आहे. त्याची कास सोडली तर उगा भलतंच काही होऊन बसायचं. इथं पंचतंत्र साऱ्या संबंधितांच्या मार्गदर्शनाला येऊ शकतं.
झालं काय की, एकदा समस्त बेडकांना असं वाटलं की, अरे साऱ्या प्राण्या-पक्ष्यांना, त्यांचा राजा असतो, मग आपल्यालाच तो का असू नये? त्यांचं शिष्टमंडळ देवाकडे गेलं. देवानं त्यांची खूप समजूत काढली, पण ते ऐकेचनात. तेव्हां देवानं तथास्तु म्हटलं. शिष्टमंडळ माघारी परतलं. त्यांच्या डबक्यात एक राजा विराजमान झालेला. सारे आनंदून गेले. चार-आठ दिवसानंतर, एक इटुकलं बेडूक त्या राजाच्या अंगावर चढलं. राजा हलेना, बोलेना की रागावेना. एकेक करुन सारे राजाच्या अंगावर क्रीडा करु लागले. तेव्हां बुजुर्ग बेडकांच्या लक्षात आले, अरे, हा कसला राजा, हा तर साधा लाकडाचा ओंडका! देवानं फसवलं. गेलं शिष्टमंडळ पुन्हा देवाकडं. देव काय, थोडे आढेवेढे घेतल्यानंतर तथास्तु म्हणायला, बसलाच होता.
माघारलेल्या बेडकांना आता चांगला राजा मिळाला, उंच मान, टोकदार चोच. राजा असा पाहिजे, रुबाबदार. असेच चार-आठ दिवस गेले. यावेळीही बुजुर्गांच्याच लक्षात आलं, अरे आपल्या प्रजेची संख्या घटू लागली आहे. मग त्यांनी पाळत ठेवली. रात्रीच्या अंधारात, त्यांचा नवा राजा, त्याच्या धर्मावर जात होता. तोच बेडकांची प्रजा गट्टम करीत होता. कारण होताच तो पिढीजात आणि जातीवंत करकोचा!
परत सारी वरात देवाकडं. देवा, तो पहिलाच बरा होता. राजा असण्याचं आम्हाला समाधानही होतं आणि त्याचा जाचही नव्हता!
तर आता मंडळी, तुम्हीच ठरवा. उद्या कुणी करकोचा यायचा आणि सारं काही गट्टम करुन टाकायचा, त्यापेक्षा आपल्या वाघालाच त्या सिंहासारखं पुन्हा गादीवर बसवलं तर! हरकत काय?

Web Title: Suppose, if Waghcha becomes lion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.