पोलिसांकडूनच सर्वोच्च न्यायालयाचा अवमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 01:08 AM2019-01-22T01:08:59+5:302019-01-22T01:09:29+5:30
कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर सोपविली आहे, त्यांनाच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा विसर पडावा, ही आश्चर्याची व खेदजनक बाब म्हणावी लागेल. भरदिवसा फटाके फोडण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असतानाही सोमवारी (दि.२१) चक्क पोलिसांनी सहकारी सोसायटीची निवडणूक जिंकल्याचा आनंदोत्सव फटाके फोडून साजरा केल्याने संताप व्यक्त होत आहे.
नाशिक : कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर सोपविली आहे, त्यांनाच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा विसर पडावा, ही आश्चर्याची व खेदजनक बाब म्हणावी लागेल. भरदिवसा फटाके फोडण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असतानाही सोमवारी (दि.२१) चक्क पोलिसांनी सहकारी सोसायटीची निवडणूक जिंकल्याचा आनंदोत्सव फटाके फोडून साजरा केल्याने संताप व्यक्त होत आहे.
जिल्हा पोलीस क्रेडिट सहकारी सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर करण्यात आला. यावेळी विजयी उमेदवारांनी ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करून विजयाचा आनंद साजरा केला ते योग्य होते; मात्र या आनंदाचे उधाण इतके वाढले की पोलिसांनाच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा विसर पडला आणि त्यांनी चक्क भरदिवसा रस्त्यावर फटाक्यांची लांबच लांब लड पेटवून बार उडवून दिला. यामुळे आता नेमकी कोण कोणावर कारवाई करणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडणाºया पोलीस दलातील काही कर्मचाºयांना मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या फटाके वाजविण्याविषयीच्या बंदीचा विसर कसा पडला? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पोलीस कर्मचाºयांनी विजयाचा आनंदोत्सवात मात्र भर दुपारी फटाके फोडल्याने हा न्यायालयाचा आदेशाचा अवमान मानला जात आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे तक्रार करणार असून संबंधितांविरुध्द कायदेशीर कारवाईची मागणी केली जाणार असल्याचे मानव उत्थान मंचाचे जसबीर सिंग यांनी सांगितले.