‘सूर ज्योत्स्ना पुरस्कार’ विजेत्यांचा नाशकात गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:47 AM2019-03-31T00:47:04+5:302019-03-31T00:47:44+5:30
‘लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २०१९’चे विजेते प्रख्यात ड्रम जेम्बेवादक शिखर नाद कुरैशी व सुमधूर आवाज आणि सांगीतिक कौशल्याने महाराष्ट्रावर जादू करणाऱ्या ‘सा रे ग म प’ फेम आर्या आंबेकर यांचा लोकमततर्फे नाशिकमध्ये पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील व ख्यातनाम गायिका डॉ. अलका देव मारुलकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
नाशिक : ‘लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २०१९’चे विजेते प्रख्यात ड्रम जेम्बेवादक शिखर नाद कुरैशी व सुमधूर आवाज आणि सांगीतिक कौशल्याने महाराष्ट्रावर जादू करणाऱ्या ‘सा रे ग म प’ फेम आर्या आंबेकर यांचा लोकमततर्फे नाशिकमध्ये पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील व ख्यातनाम गायिका डॉ. अलका देव मारुलकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
‘लोकमत’तर्फे आयोजित सेलो प्रेझेंट पॉवर्ड बाय रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिरमध्ये शुक्रवारी (दि.२९) रंगलेल्या या दिमाखदार गौरव सोहळ्यात ‘सूर ज्योत्स्ना’ राष्ट्रीय संगीत पुरस्काराच्या सहाव्या पर्वातील विजेते शिखर नाद कुरैशी यांनी त्यांच्या ड्रम जेम्बेचे सादरीकरण करीत श्रोत्यांची दाद मिळविली, तर दुसरी विजेता महाराष्टÑाची लाडकी गायिका आर्या आंबेकर यांनीही यावेळी श्रोत्यांना गायनाची प्रसन्न अनुभूती दिली. त्यांनी ‘ती सध्या काय करते’ चित्रपटातील ‘हृदयात वाजे समथिंग...’, त्यांच्या अल्बममधील ‘दिवा लागू दे रे देवा...’ यासह ‘लग जा गले...,’ ‘बाहों में चले आ...’ ही हिंदी गाणी व ‘तुला पाहते रे...’ हे शिर्षक गीतही सादर केले. तिला शिखर नाद यांनी ड्रम जेम्बेची साथसंगत केली.
सोहळ्याच्या उत्तरार्धात फिल्मफेअर पुरस्कार विजेती गायिका व नायिका केतकी माटेगावकर यांच्या स्वरांनी बहरलेला मराठी व हिंदी गीतांचा ‘सांज सरगम’ कार्यक्रम सादर करण्यात आला. यात प्रारंभी प्रसेनजित कोसंबी यांनी ‘सूर निरागस हो’ या गीताचे सादरीकरण करत श्री गणेशाचे वंदन केले, तर सुवर्णा माटेगावकर यांनी ‘कारे दुरावा, कारे अबोला’ हे गीत सादर करून रसिकांची मने जिंकली. त्यानंतर केतकी माटेगावकर यांनी एकामागून एक सादर केलेल्या ‘गुरू एक जगी त्राता’ या गुरुवंदनेनंतर ‘जीव लगा कधी रे येशील तू’, ‘मला वेड लागले प्रेमाचे’ आदी गाण्यांना रसिकांनी टाळ्यांची साथ करीत उत्स्फूर्त दाद दिली. यावेळी तमीळ भाषेत इलया राजा यांच्यासोबत काम करताना आलेला अनुभव माटेगावकर यांनी रसिकांसमोर उलगडून सांगितला. विशाल गंडद्वार, अभय इंगळे, केदार मोरे, विवेक परांजपे, प्रसाद गोंदकर यांनी साथसंगत केली. मयुरेश साने यांच्या निवेदनाने कार्यक्रमात रंगत भरली. संयोजन पराग माटेगावकर यांनी केले. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सखी मंचच्या संस्थापक तथा संगीत साधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ‘सूर ज्योत्स्ना’ अॅथमने कार्यक्रमाची सुरुवात झाली. हे अॅथम प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी लिहिले असून, प्रसिद्ध गायक सोनू निगम व अल्का याज्ञीक यांनी स्वरबध्द केले आहे. तर ललित पंडित यांनी संगीत दिले आहे. याप्रसंगी दीपक बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सचे दीपक चंदे, हॉटेल एक्स्प्रेस इनचे व्यवस्थापक रवी नायर आदी मान्यवर उपस्थित होते. लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल, सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक, लोकमत टाइम्सचे शैलेश लांबे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक बी. बी. चांडक यांनी केले.
संगीताची भाषा संकेताची असते. संगीताच्या माध्यमातून जगात हार्मनी म्हणजेच सद्भावना, सुसंवाद, एकोपा वृद्धिंगत होऊन तसेच समाजातील विविध सुंदर घटकांचा मिलाप होऊन जगात शांतता नांदू शकते. अशा संगीत क्षेत्रातील कलावंतांना प्रोत्साहन देणारा ‘सूर ज्योत्स्ना पुरस्कार’ अद्वितीय उपक्रम आहे.
- विश्वास नांगरे-पाटील, पोलीस आयुक्त, नाशिक
शिखर नाद कुरेशी आणि आर्या आंबेकर यांच्यासारख्या कलाकारांचा गौरव करण्याची संधी ‘सूर ज्योत्स्ना पुरस्कार’ उपक्रमाच्या माध्यमातून मिळाली ही अभिमानास्पद बाब आहे. सूर ज्योत्स्ना पुरस्कार विजेत्या कलाकारांसोबतच ‘लोकमत’च्या उपक्रमालाही खूप शुभेच्छा.
- डॉ. अलकाताई देवमारुलकर, ज्येष्ठ गायिका, नाशिक