नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी सुरज मांढरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 01:58 AM2019-03-13T01:58:08+5:302019-03-13T01:58:40+5:30
आचारसंहिता सुरू होऊन प्रशासन व्यवस्था निवडणुकीच्या कामात व्यस्त असताना जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिक : आचारसंहिता सुरू होऊन प्रशासन व्यवस्था निवडणुकीच्या कामात व्यस्त असताना जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राधाकृष्णन् यांना मुंबईत महाराष्टÑ मेरी टाइम महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे. नूतन जिल्हाधिकारी मांढरे यांचे मंगळवारी रात्री उशिरा नाशकात आगमन झाले.
राधाकृष्णन् यांची २ मे २०१६ रोजी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना तीन वर्षे पूर्ण होण्यास दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असतानाच त्यांची बदली झाली आहे. विशेष म्हणजे राधाकृष्णन् यांनी स्वत:च यापूर्वी आपली बदली होणार नाही असा पुनरुच्चार केला होता. त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात असून, त्यांचे मुख्यमंत्र्यांच्या सचिवांशी असलेले निकटचे संंबंधदेखील त्यांची बदली रोखण्यास कामी आले नाहीत असेच यावरून स्पष्ट झाले आहे. राधाकृष्णन् यांच्या काळात समृद्धी महामार्ग, जलयुक्त शिवार व वनहक्क कायद्याची अंमलबजावणीचे कामे करण्यात आली. राधाकृष्णन् यांनी निवडणुकीच्या कामाला प्राधान्य दिले होते. याची तयारी त्यांच्या नेतृत्वाखालीच करण्यात आली असे असताना त्यांच्या बदलीने अनेकांना धक्का बसला आहे. अपवाद वगळता सर्व उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांची वीस दिवसांपूर्वी बदल्या करण्यात आल्या असून, त्यांच्या जागी आलेल्या नवीन अधिकाऱ्यांना पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागत असताना आता जिल्हाधिकाऱ्यांचीही बदली झाल्याने नूतन जिल्हाधिकारी मांढरे यांनादेखील नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. राधाकृष्णन् यांच्या बदली होण्यामागे अनेक अंदाज बांधले जात असले तरी, आयोगाच्या दट्ट्यामुळे राज्य सरकारला त्यांची बदली करावी लागल्याचे बोलले जात आहे. आयोगाने अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी जे नियम, निकष ठरवून दिले होते, त्यानुसार उपजिल्हा -धिकारी, तहसीलदारांच्या बदल्या झाल्या. परंतु जिल्हाधिकाºयांना त्यातून वगळण्यात आले होते. ज्या अधिकाºयाने निवडणुकीचे कामकाज केले असेल अशांच्याही बदल्या करण्यात याव्यात, असे आयोगाचे आदेश होते, राधाकृष्णन् यांनी दोन वर्षांत विधान परिषदेच्या दोन निवडणुका पार पाडल्यामुळेच त्यांची बदली झाली आहे.
पुणे जिल्ह्णातील शिक्रापूर येथे जन्मलेले मांढरे हे १९९४ मध्ये परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून अमरावती येथे रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी धारणी, बुलढाणा, अकोट, अकोला, कोल्हापूर येथे उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले. पुणे येथे जिल्हा पुनर्वसन अधिकारी व त्यानंतर मिरजचे प्रांत म्हणूनही त्यांनी कामकाज केले आहे. २००५ मध्ये पुणे महापालिकेच्या उपायुक्तपदीही त्यांनी काम पाहिले. राज्य वखार महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक, औरंगाबादला महसूल उपायुक्त, मंत्रालयात महसूल विभागात कार्य अधिकारी तसेच मुख्य सचिवांच्या कार्यालयात सहसचिवपदी त्यांनी काम पाहिले. २०१० मध्ये त्यांची भारतीय प्रशासन सेवेत पदोन्नती देण्यात आली. २०१७ पासून ते पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.