जिल्ह्यातील आदिवासींच्या कलाकौशल्याला वनविभागाने वाव द्यावा : सुरज मांढरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 04:23 PM2019-07-17T16:23:50+5:302019-07-17T16:24:17+5:30
नाशिक पुर्व-पश्चिम वनविभागाच्या वतीने उंटवाडी येथील वनविश्रामगृहाच्या सभागृहात बुधवारी (दि.१७) संत तुकाराम वनग्राम योजनेच्या जिल्हास्तरीय बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मांढरे हे प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.
नाशिक : आदिवासी बांधवांना वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी जवळून ओळखतात. त्यांच्यातील सुप्त कलागुणांची त्यांना जाणीव असते. वनविभागाने मध्यवर्ती कारागृहाप्रमाणेच आदिवासींच्या कौशल्यविकासासाठी प्रयत्न करावे. त्यांनी बांबूपासून तयार केलेल्या विविध वस्तूंच्या विक्रीसाठी स्टॉल्स उपलब्ध करून द्यावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी यावेळी केली.
नाशिक पुर्व-पश्चिम वनविभागाच्या वतीने उंटवाडी येथील वनविश्रामगृहाच्या सभागृहात बुधवारी (दि.१७) संत तुकाराम वनग्राम योजनेच्या जिल्हास्तरीय बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मांढरे हे प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपिठावर उपवनसंरक्षक जी.मल्लिकार्जुन, शिवाजी फुले, तुषार चव्हाण उपस्थित होते. यावेळी मांढरे म्हणाले, बांबूच्या वस्तू विक्र ीसाठी वनविभागाने चांगले व्यासपिठ आदिवासींना उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी वनमंत्रालयाच्या बांबू विकास मंडळाचे सहकार्य घ्यावे. ‘बांबू क्लस्टर’च्या माध्यमातून आदिवासींच्या कलेला चांगला ‘बूस्ट’ मिळू शकेल, जेणेकरून जिल्ह्याचा ठसा राज्यभरात वेगळ्या पध्दतीने उमटेल.
दरम्यान, नाशिक पश्चिम विभागातील ननाशी वनपरिक्षेत्रातील गवळीपाडा (महाजे) येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीने जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. मान्यवरांच्या हस्ते समितीच्या पदाधिकाऱ्यांना ५१ हजार रूपयांचा धनादेश, सन्मानपत्र यावेळी प्रदान करण्यात आले. याप्रसंगी सुरगाणा वनपरिक्षेत्राचे सहायक वनसंरक्षक सुजीत नेवसे, ननाशी परिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे, त्र्यंबकेश्वरचे कैलास अहिरे यांसह तीनही गावांचे समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पुर्व विभागातील सुरगाणा वनपरिक्षेत्रातील गोंदुने आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीघाट पाड्याने वनसंवर्धनात अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला. या गावांच्या समित्यांना यावेळी अनुक्रमे ३१ हजार व ११ हजाराचे बक्षीस देण्यात आले. प्रास्ताविक फुले यांनी केले. सुत्रसंचालन सहायक वनसंरक्षक राजेंद्र मगदुम यांनी केले.
राज्यस्तरीय प्रथम क्रमांकासाठी प्रयत्न करा
वनसंवर्धनामध्ये आघाडी घेत गवळीपाड्याने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच गोंदुने, श्रीघाट या गावांनी आपले स्थान राखले. गवळीपाडा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला असून या पाड्यावरील नागरिकांनी एकदिलाने वनविकास व संवर्धनासाठी अधिकाधिक प्रयत्न करावे. जेणेकरून राज्यस्तरावरही प्रथम क्रमांक पटकाविता येईल. भविष्याच्या या संधीचा उत्तम फायदा गावकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी शिवाजी फुले यांनी केले.