येवला उपनगराध्यक्षपदी सूरज पटणी
By admin | Published: December 30, 2016 11:19 PM2016-12-30T23:19:42+5:302016-12-30T23:20:08+5:30
बिनविरोध निवड : अजय जैन, रूपेश दराडे आणि राजेंद्र लोणारी स्वीकृत सदस्य
येवला : पालिका राजकारणात अनिष्ठ प्रथेला थारा मिळू नये, घोडेबाजार थांबवा आणि सकारात्मक विधायक विकासाची भूमिका घेत राष्ट्रवादीने भाजपाला साथ देण्याची भूमिका घेतल्याने पालिकेच्या उपनगराध्यक्ष-पदी शिवसेनेचे सूरज जगदीश पटणी यांची बिनविरोध निवड झाली आणि पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या तीन जागांवर राष्ट्रवादीचे अजय जैन, भाजपाचे रूपेश दराडे, शिवसेनेचे राजेंद्र लोणारी यांची नियुक्ती झाली. येवला पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आणि उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदाच्या नियुक्त्या अगदी चुरशीच्या होतील, अशी चर्चा होती; परंतु राष्ट्रवादीने अपक्षांना धडा शिकवण्याची भूमिका घेऊन भाजपा -सेनेला साथ केल्याने निवडी बिनविरोध झाल्या. येवला पालिकेत शुक्रवारी सकाळी ११ वाजता सुरू झाली. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे नेते माणिकराव शिंदे यांनी अपक्षांच्या छळाची सद्दी आणि मनमानी संपवणे आणि चालू असलेला विकास असाच पुढे नेण्यासाठी भाजपाला साथ करण्याची राष्ट्रावादीची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. येथेच सभेचा टोन बदलला आणि बिनविरोध निवडी निश्चित झाल्या. दरम्यान दुपारी १२ वाजता वंदे मातरमने सभेला सुरु वात झाली. प्रास्ताविकात मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी विकासकामासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी सहकार्य आहेच, असे सांगून सभेची सूत्रे पीठासन अधिकारी नूतन नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्याकडे सुपूर्द केली. प्रथम उपनगराध्यक्ष पदासाठी दाखल चार उमेदवारी अर्जांची छाननी झाली. यात शिवसेनेच्या वतीने सूरज पटणी, दयानंद जावळे, भाजपाच्या वतीने प्रमोद सस्कर व अपक्षांच्या वतीने सौ. पद्मा शिंदे यांचे चार अर्ज मंजूर असल्याचे सभागृहाला सांगून उमेदवारी अर्जाच्या माघारीसाठी १५ मिनिटे देण्यात आली. राष्ट्रवादीने नगरसेवक निसार शेख यांच्या उपनगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसंदर्भात घोषणा करून रा.कॉँॅ.च्या दहा नगरसेवकांना व्हीपदेखील बजावला होता. परंतु राष्ट्रवादीने उपनगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उमेदवारच उतरवला नाही. आणि भाजपा-सेना युतीला साथ देण्याची भूमिका सभागृहात घेतली. दरम्यान, गटागटाचे गुप्तगूदेखील झाले. निर्धारित वेळेत पद्मा शिंदे, दयानंद जावळे आणि प्रमोद सस्कर यांनी क्र मश आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. आणि केवळ शिवसेनेचे सूरज पटणी यांचा एकमेव अर्ज उपनगराध्यक्ष पदासाठी शिल्लक राहिल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा पीठासन अधिकारी यांनी केली. या निवडीनंतर नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष म्हणून सूरज पटणी यांना सन्मानाने आसनस्थ केले. यानंतर पालिका सभागृहातील पक्षीय बलाबल आणि स्वीकृत नगरसेवक निवडीची कार्यपद्धती पालिकेचे ज्येष्ठ लिपिक बापू मांडवाडकर यांनी सभागृहाला सांगितली. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेचे राजेंद्र लोणारी, भाजपाचे रूपेश दराडे, तर राष्ट्रवादीच्या वतीने अजय जैन, पंकज पारख, सुनील काबरा, हुसेन शेख यांचे उमेदवारी अर्ज दाखल असल्याची माहिती दिली. शहर विकास आघाडीचे योगेश पाटील यांनी दाखल केलेला अर्ज नामंजूर झाल्याचे सांगितले. राष्ट्रवादीच्या वतीने स्वीकृत सदस्य पदासाठी चार अर्ज दाखल असल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेस गटनेते डॉ. संकेत शिंदे यांनी अजय जैन यांच्या नावाचे घोषणापत्र पीठासन अधिकाऱ्याला सादर केल्याने जैन यांची निवड झाली. तसेच स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेचे राजेंद्र लोणारी व भाजपाचे रूपेश दराडे यांचा दोन्ही गटाकडून प्रत्येकी एक नावाची शिफारस असल्याने त्यांच्या नियुक्तीची घोषणा झाली. यावेळी सभागृहात नगरसेवक डॉ. संकेत शिंदे, शेख परवीन बानो निसार, शेख तेहसीन अ. रज्जाक, शेख निसार, मोमीन सबिया अ सलीम, शेख रईसा बानो शेख, सचिन शिंदे, शीतल शिंदे, प्रवीण बनकर, नीता परदेशी, पुष्पा गायकवाड, छाया देसाई, प्रमोद सस्कर, पद्मा शिंदे, गणेश शिंदे, छाया क्षीरसागर, रूपेश लोणारी, दयानंद जावळे, किरण जावळे, सरोजिनी वाखारे, शफिक शेख, सचिन मोरे, अमजद शेख उपस्थित होते. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली. पालिका सभेचे नियोजन करण्यासाठी मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली बापू मांडवडकर, अशोक कोकाटे, शिवशंकर सदावर्ते, सुभाष निकम, सोमनाथ भुरक, प्रवीण नागपुरे उपस्थित होते. (वार्ताहर)