सुरगाण्याला ३३ तासांत २२६ मिलिमीटर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 01:01 AM2018-07-13T01:01:50+5:302018-07-13T01:02:10+5:30
नाशिक : जिल्ह्णात पावसाने सर्वदूर हजेरी लावली असून, पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरगाणा तालुक्याला गेल्या ३३ तासांत चांगलेच झोडपून काढले आहे. या काळात २२२६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ४५१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली, दुपारनंतर मात्र पावसाने ग्रामीण भागात उघडीप दिली आहे.
बुधवारी सकाळपासून पावसाने नाशिक शहरासह ग्रामीण भागातही जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग सुखावला असून, दुबार पेरणीचे ठाकलेले संकट दूर होण्यास या पावसामुळे मदत झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सलग पडलेल्या पावसामुळे नद्या, नाल्यांना काही प्रमाणात पाणी आल्याने जिल्ह्यातील धरणाच्या पाणी साठ्यातही वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ४५१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, त्यात पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाºया सुरगाणा तालुक्यात सर्वाधिक १०४ मिलिमीटर इतका तर त्या खालोखाल इगतपुरी येथे ९६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. पेठ तालुक्यात ९५ तर त्र्यंबकेश्वरला ५९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामानाने अन्य तालुक्यांना जेमतेम पाऊस नोंदविला गेला. गुरुवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरगाणा येथे अतिवृष्टी होऊन १२२ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला आहे. या पावसामुळे सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागाचा संपर्क तुटला असून, नद्या, नाल्यांना पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक शहरात दिवसभर अधून-मधून पावसाची हजेरी कायम होती. सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरात ३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.