सुर्वेंचे साहित्य वास्तववादी : डॉ. सपकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 01:02 AM2019-10-16T01:02:57+5:302019-10-16T01:03:16+5:30
सुर्वे यांचे साहित्य समग्र मानवी जीवनाकडे पाहणारे होते. स्वत:ला पाहणे आणि माणसाला पाहणे खूप अवघड काम असते. मात्र त्यातल्या त्यात माणसाकडे पाहणे हे खूप अवघड असते. माणूस हा श्रमिक आहे. सुर्वे यांची भूमिका ही कधीही ठामच असायची, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. अनिल सपकाळ यांनी केले. यावेळी त्यांनी सुर्वे यांच्या साहित्यातील अनेक उदाहरणेही विशद केली.
सिडको : सुर्वे यांचे साहित्य समग्र मानवी जीवनाकडे पाहणारे होते. स्वत:ला पाहणे आणि माणसाला पाहणे खूप अवघड काम असते. मात्र त्यातल्या त्यात माणसाकडे पाहणे हे खूप अवघड असते. माणूस हा श्रमिक आहे. सुर्वे यांची भूमिका ही कधीही ठामच असायची, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. अनिल सपकाळ यांनी केले. यावेळी त्यांनी सुर्वे यांच्या साहित्यातील अनेक उदाहरणेही विशद केली.
कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार व कैलास पगारे विशेष काव्य पुरस्काराच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर साहित्यिक उत्तम कांबळे, राहुल पगारे आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. सपकाळ यांनी कवी नारायण सुर्वे यांच्या साहित्य लेखनाबद्दल विवेचन करताना सांगितले की, लेखकांनी बोलणे गरजेचे असून लेखकांना साहित्याच्या माध्यमातून बोलते करण्यासाठी सुर्वे यांच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार हे खरोखरच योग्य आहेत. आपण जीवनात जसे जगतो तसेच आपण आपल्या साहित्यातून दिसलो पाहिजे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
कार्यक्र माचे प्रास्ताविक प्रा. नागार्जून वाडेकर यांनी केले. तर परिचय राजू नाईक यांनी करून
दिला. सूत्रसंचालन स्वप्ना शार्दूल यांनी केले तर आभार दत्तू तुपे यांनी मानले.
पुरस्कारार्थी
नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार डॉ. संघमित्रा खंडारे यांच्या ‘थ्रिशोल्ड फिक्वेन्सी’ या काव्यसंग्रहाला देण्यात आला. त्याचबरोबर तुकाराम चौधरी यांच्या पाड्यावरचा ‘टिल्ल्या’ या कादंबरीला, शिरीष देशमुख यांच्या ‘फरदड’ या कथासंग्रहाला तर कैलास पगारे काव्य पुरस्कार हा अमोल आहेर यांना ‘मुक्काम पोस्ट : माणूस’ या काव्यसंग्रहाला देण्यात आला. याचबरोबर यावेळी आदिवासी पाड्यावरील मनीषा पडेर, निशा वैजल व सोनाली पवार यांचा राष्ट्रीय पातळीवर खोखो स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.