सुरेशदादा जैन उपचारासाठी मुंबईस रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 01:29 AM2019-10-24T01:29:21+5:302019-10-24T01:33:02+5:30
माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची प्रकृती बिघडल्याने जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना बुधवारी (दि. २३) तातडीने मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता तेथे त्यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत.
नाशिक : माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची प्रकृती बिघडल्याने जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना बुधवारी (दि. २३) तातडीने मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता तेथे त्यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने सुरेशदादा जैन यांची प्रकृती बिघडल्याने मंगळवारी (दि. २२) त्यांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.
मंगळवारी दुपारी जैन यांच्या छातीत अचानक कळा येऊ लागल्या तसेच श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यांच्या रक्तातील साखरेच्या प्रमाणाबरोबरच रक्तदाबदेखील वाढला होता. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तातडीने वैद्यकीय तपासणी केली, तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण २९७ पर्यंत वाढल्याचे आढळले होते. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. विशेषत: रक्तशर्करेचे प्रमाण नियंत्रित करण्याचे उपचार वैद्यकीय अधिकाºयांनी केले. मात्र याच दरम्यान करण्यात आलेल्या तपासणीत त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याचेदेखील आढळले होते. त्यामुळे वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांना तातडीने मुंबईस पुढील उपचारासाठी पाठविण्याचा सल्ला दिला. कागदपत्रांची कायदेशीर पूर्तता होणे बाकी असल्याने मंगळवारी (दि.२२) सायंकाळी त्यांना पुन्हा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले. बुधवारी (दि.२३) कागदपत्रांची पूर्तता करण्यात आल्यानंतर त्यांना दुपारी मुंबईतील जे. जे. रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले.
जळगाव येथील घरकुल घोटाळ्याप्रकरणी त्यांना ३० आॅगस्ट रोजी नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले होते. त्यांचे वय ७७ असून, वयोमानामुळे ते अशक्त झाले आहेत. त्यांच्यावर यापूर्वी हृदयविकारामुळे शस्त्रक्रिया-देखील करावी लागली आहे.