सुरगाणा, इगतपुरीत शेतकामांना वेग
By admin | Published: July 22, 2014 10:26 PM2014-07-22T22:26:00+5:302014-07-23T00:29:21+5:30
सुरगाणा : तालुक्यात पावसाची नोंद झाली असून, शेतकामांना वेग आला आहे.
सुरगाणा : तालुक्यात पावसाची नोंद ठेवण्यासाठी पाच ठिकाणी डिजिटल पर्जन्यमापक बसविले असल्याने पावसाची बारकाईने नोंद होत आहे. यात एक दिवसाची पावसाची चांगली नोंद झाली असून, शेतकामांना वेग आला आहे.
तालुक्यात पावसाची नोंद होण्यासाठी मागील वर्षापासून पाच ठिकाणी डिजिटल पर्जन्यमापक बसविण्यात आलेले असल्याने कुठे किती पाऊस झाला याची उपयुक्त माहिती मिळण्यास मदत होत आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजेपासून ते शनिवार सकाळी ९ वाजेपर्यंत या २४ तासात सर्वाधिक ७२.४ मि.मी. पावसाची नोंद मनखेड येथे झाली असून, त्याखालोखाल बाऱ्हे येथे ७२, सुरगाणा येथे ६६.८, उंबरठाण येथे ६१.३ तर बोरगाव येथे ३२.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पाचही ठिकाणची एकूण नोंद (एका दिवसाची) ३0४.९ मि.मी. एवढी आहे.
सुरगाणा व परिसरात पावसाने शुक्रवारपासून कायम सातत्य ठेवले आहे. शिंदे परिसरात जोरदार पाऊस झाल्याचे समजते. शनिवारीही दुपारनंतर जोरदार वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.
दरम्यान, दोन दिवस पाऊस झाला असून, अद्यापपर्यंत नदी, नाले, लहान मोठे ओहळ यांना पाणी उतरले नसल्याने तालुक्यातील पाझरतलाव, वनतळे, शेततळे, गावतळे पूर्णपणे भरू शकलेले नाहीत. मात्र जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला असल्याचे बोलले जात आहे.
इगतपुरी : पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे.
पावसाचे महिनाभर ओढ दिल्याने भात आवणीची कामे थांबली होती. गेल्या
चार-पाच दिवसांपासून धो धो पडणाऱ्या पावसाने सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे. वातावरण आल्हाददायक झाले असून, परिसर हिरवाईने नटला आहे. त्यात अधूनमधून धुक्यानी झालर बघायला मिळत आहे. (वार्ताहर)