सुरगाणा येथील प्रकार : जादूटोण्याच्या संशयावरून त्रास दिल्याची पोलिसांत तक्रार गावकीने बहिष्कृत केलेल्या वृद्धाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 01:27 AM2017-11-04T01:27:50+5:302017-11-04T01:27:55+5:30
हातावर पोट असलेल्या आणि ‘त्याच्याकडे देव आहेत आणि तोे गुरेढोरे मारतो,’ अशा समजुतीने केलेल्या छळवणुकीमुळे गावकीच्या बाहेर वास्तव्यास असलेल्या पांडू धर्मा चौधरी (वय ७७) या वृद्धाने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भातील तक्रार अर्ज त्याचे नातू असलेल्या देवीदास चौधरी यांनी पोलीस ठाण्यात केला आहे.
नाशिक : हातावर पोट असलेल्या आणि ‘त्याच्याकडे देव आहेत आणि तोे गुरेढोरे मारतो,’ अशा समजुतीने केलेल्या छळवणुकीमुळे गावकीच्या बाहेर वास्तव्यास असलेल्या पांडू धर्मा चौधरी (वय ७७) या वृद्धाने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भातील तक्रार अर्ज त्याचे नातू असलेल्या देवीदास चौधरी यांनी पोलीस ठाण्यात केला आहे.
राज्यात जादूटोणा आणि सामाजिक बहिष्काराविरोधात कायदा होऊनही अशा घटना टळत नसल्याचे या प्रकाराने पुढे आले आहे. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणात चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.
सुरगाणा तालुक्यातील धामणकुंड येथे हा प्रकार घडला. पांडू चौधरी यांच्यासह कुटुंबीयांचा शेती व्यवसाय आहे. गेल्या सहा महिन्यांपासून गावातील दुर्घटनांना कारणीभूत ठरवून चौधरी यांना त्रास दिला जात होता. त्यांच्याकडे देव असल्याने गावात माणसे आणि जनावरांचे अकाली मृत्यू होत असल्याचे गावातील काहींचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांना त्रास दिला जात असल्याने दोन महिन्यांपूर्वी ते अन्यत्र (धूरपाडा) वास्तव्यास गेले होते. मात्र गावदेवाच्या पूजेच्या निमित्ताने त्यांना गावात पुन्हा बोलावण्यात आले. त्यातच गावात एक रेडा मृत्युमुखी पडला आणि त्यापोटी पुन्हा या कुटुंबीयांना त्रास दिला गेल्यानेच त्यांनी शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी देवीदास चौधरी यांची तक्रार आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्यवाह महेंद्र दातरंगे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानुसार सुरगाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक कानडे यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचेही दातरंगे यांनी सांगितले. दरम्यान, सुरगाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पांडू चौधरी यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी त्यांचे केवळ कुटुंबीय उपस्थित होते.