मुंबईहून बेपत्ता पारस पालकांच्या ताब्यात सुखरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 02:22 PM2018-09-06T14:22:02+5:302018-09-06T14:23:30+5:30
इगतपुरी : मुंबई येथून बेपत्ता झालेल्या १४ वर्षीय मुलाला रेल्वेतील एका तिकीट तपासनिसाने (टीसी) प्रसांगावधान राखत त्याच्या आईवडिलांच्या स्वाधीन केल्याची घटना इगतपुरी रेल्वे स्थानकावर घडली आहे. पारस केयरवान (१४, रा.पवई ,मुंबई) हा मंगळवारी राहत्या घरातून बेपत्ता झाला होता. घरातून रागाने बाहेर गेला असल्याची मिसिंग तक्र ार त्याच्या पालकांनी पवई पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान, हा मुलगा बुधवारी दि.५ रोजी औरंगाबादहुन मुंबईकडे जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये तिकीट तपासणी करणारे सुरेश सपकाळे यांना एकटाच दिसून आला.तो घाबरलेल्या अवस्थेत पाहून सपकाळ यांनी त्याला धीर देत इगतपुरी रेल्वे स्थानकात उतरवले. लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधून त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याचे वडील जगदीशचंद्र केयरवान,रा. मुंबई येथे संपर्क साधण्यात आला. दरम्यान, त्याच्या पालकांनी इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात येऊन मुलाला सुरक्षित पाहून आनंद व्यक्त करत , टीसी सपकाळे , इगतपुरी लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व पोलीस कर्मचारी यांचे आभार मानले.