गणेशमूर्ती संकलनात घट झाल्याने आश्चर्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:49 AM2018-09-26T00:49:31+5:302018-09-26T00:50:25+5:30
पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची चळवळ फोफावलेल्या नाशिक नगरीत यंदा विसर्जित मूर्ती दानाच्या संख्येत घट झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अर्थात, प्रतिसाद कमी मिळाला की महापालिकेच्या म्हणण्यानुसार शाडूमातीच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन झाले हा वादाचा मुद्दा ठरला असून, मनपाच्या दाव्याविषयी चळवळीतील कार्यकर्त्यांनी काहीशी शंका व्यक्त केली आहे.
नाशिक : पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची चळवळ फोफावलेल्या नाशिक नगरीत यंदा विसर्जित मूर्ती दानाच्या संख्येत घट झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अर्थात, प्रतिसाद कमी मिळाला की महापालिकेच्या म्हणण्यानुसार शाडूमातीच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन झाले हा वादाचा मुद्दा ठरला असून, मनपाच्या दाव्याविषयी चळवळीतील कार्यकर्त्यांनी काहीशी शंका व्यक्त केली आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची चळवळ आता जोर धरू लागली आहे. महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रेरणेतून नाशिकमध्ये १९९८ मध्ये विसर्जित मूर्ती आणि निर्माल्य संकलन करण्याची मोहीम सुरू झाली. दुसऱ्या वर्षापासून त्यासाठी नाशिक महापालिकेने पुढाकार घेतला आणि आता तर विविध संस्था संघटना मूर्ती संकलनात प्रत्यक्ष सहभागी होत असल्याने ही जनचळवळ झाली आहे. नाशिकमध्ये १ लाख ९५ हजार मूर्ती संकलनाचा यापूर्वी उच्चांक झाला आहे. मात्र दोन ते तीन वर्षांत घट होऊ लागली आहे. यंदाच्या वर्षी १ लाख १६ हजार ८९६ इतक्या मूर्ती संकलित झाल्या. गतवर्षीच्या तुलनेत त्यात ५३ हजाराने घट झाली असून, त्यामुळे अंनिसचे कृष्णा चांदगुडे यांनी शंका उपस्थित केली आहे. नाशिक महापालिकेने मात्र घरोघर शाडूमातीचे गणपती तयार करणे आणि बसविणे या बाबी वाढल्या आहेत. शिवाय कृत्रिम तलाव किंवा घरीच मूर्ती विसर्जित करण्याचे प्रकार वाढल्याने घट झाल्याचा दावा केला आहे. अलीकडे गणेशोत्सवापूर्वीच शाळा आणि अन्य ठिकाणी शाडूमातीच्या मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळा होतात शिवाय नागरिकांत पर्यावरण जागृती वाढली आहे. त्याचा अनुकूल परिणाम दिसून येत असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. याशिवाय महापालिकेच्या वतीने यंदा ४६ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. त्यातही मूर्ती विसर्जित केल्या जातात. शिवाय नागरिक घरगुती विसर्जनदेखील करतात, असे महापालिकेचे म्हणणे आहे.