पक्षीय उमेदवारांच्या माघारीने आश्चर्य
By admin | Published: February 14, 2017 12:36 AM2017-02-14T00:36:24+5:302017-02-14T00:36:36+5:30
घूमजाव : कळवण, सटाणा, देवळा, येवला, इगतपुरीतील प्रकार
नाशिक : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी जिल्ह्यातील विविध गट आणि गणांमधुन राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांनी माघार घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उमेदवारांच्या माघारीमुळे निवडणुकीपुर्वीच या पक्षांना धक्का बसल्याने चर्चेला उधाण आले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सोमवारी माघारीची अंतिम मुदत असल्याने सर्वच तालुक्यातील तहसील कार्यालयांमध्ये माघारीसाठी उमेदवार आणि समर्थकांची गर्दी झाली होती. तुल्यबळ उमेदवारांबरोबरच बंडोंबांना थंड करण्यासाठी पक्षाचे नेते आणि अधिकृत उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली. मुदतीच्या आत माघारीचा अर्ज निवडणुक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध ‘अर्थ’पूर्ण घडामोडीही घडल्या. एकीकडे पक्षीय उमेदवार बंडोबांना थंड करण्यात मग्न असताना काही ठिकाणी पक्षाने अधिकृत उमेदवारी देऊनही काही उमेदवारांनी अनपेक्षितपणे माघार घेतल्याने या पक्षांना मोठा धक्का बसला असून उमेदवारांनी माघार का घेतली याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. (प्रतिनिधी) कळवण तालुक्यातील अभोणा गट आणि गणातुन राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जयश्री पवार यांनी माघार घेतली असली तरी खर्डे दिगर गटात त्यांची उमेदवारी कायम आहे. माघारीच्या अंतिम दिवशी पक्षीय उमेदवारांनी माघार घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सटाणा तालुक्यात ठेंगोडा गटातुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अधिकृत उमेदवार पुनम ठोके, लखमापूर गणातुन कॉँग्रेसचे समाधान अहिरे यांनी माघार घेतली. तर या गणात भाजपाचे जिल्हा चिटणीस गजेंद्र चव्हाण यांनी बंडाचे निशान फडकवत अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे.
देवळा तालुक्यातील उमराणे गणातुन कॉँग्रेसचे उमेदवार रतन देवरे, वाखारी गटातून शिवसेनेच्या जयश्री देवरे यांनी अचानकपणे माघार घेतली. सिन्नर तालुक्यातील देवपूर गटातुन कॉँग्रेसच्या शोभा गोरडे यांनी तर ठाणगाव गणातुन राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवार हौशाबाई पवार यांनी माघार घेतली.
येवला तालुक्यातील धुळगाव गणातुन भाजपचे रविंद्र शेळके, सायगाव गणातुन कॉँग्रेसच्या रंजना भागवत , राजापुर गटातुन भाजपाच्या आरती धाकणे यांनी माघार घेतल्यानंतर पक्षाने देबिता आवारे यांना उमेदवारी बहाल केली. इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे गणातुन मनसेच्या चैताली आवारी नांदगाव बुद्रुक गणातुन राष्ट्रवादीच्या तान्हुबाई रोंगटे यांनी माघार घेतली.निफाड तालुक्यात नव्यानेच झालेल्या उगाव गटात कोठुरे आणि उगाव असे दोन गण आहेत. कोठुरे गणातून कॉँग्रेसने पंचायत समितीचे सभापती व राष्ट्रवादीचे नेते सुभाष कराड यांच्या पत्नी मीनाक्षी कराड यांना अधिकृत उमेदवारी दिली. मात्र उगाव गटातील अपक्ष उमेदवार राजेंद्र डोखळे यांनी शेतकरी विकास आघाडी स्थापन करून मीनाक्षी कराड यांना आघाडीत घेतल्याने कॉँग्रेसला कोठुरे गणात ऐनवेळी अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत करावे लागले. विशेष म्हणजे उगाव गटातून कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांचे बंधू भास्कर पानगव्हाणे यांना कॉँग्रेसने उमेदवारी दिली आहे.